साठे दाम्पत्याकडून कांद्याचे पूजन

साठे दाम्पत्याकडून कांद्याचे पूजन

निफाड । प्रतिनिधी Niphad

नैताळे येथील संजय साठे व शोभा साठे यांनी लक्ष्मीपूजनाला कांद्याचे पूजन करुन केंद्र सरकारचे कांदा बाजारभावाकडे लक्ष वेधत सरकारच्या धोरणांवर असमाधान व्यक्त केले आहे.

सध्या संपूर्ण देशात कांदा हाच चर्चेचा विषय असून उन्हाळ कांदा संपुष्टात आला असतांना बाजारभावाला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात केला. त्याचा निषेध करण्यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे व त्यांच्या पत्नी शोभा साठे यांनी लक्ष्मीपूजनाला आपल्या चाळीत असलेल्या कांद्याचे पूजन करुन कांदा हेच शेतकर्‍यांना तारणारे पीक असल्याचे दाखवून दिले.

सध्या सरकारचे धोरण म्हणजे शेतकर्‍यांसाठी मरण ठरू लागले आहे. गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ, अतिवृष्टी, प्रतिकूल हवामान आणि शेतमालाचे कोसळते बाजारभाव, व्यापारी पलायन याचा फटका शेतकर्‍यांना बसत आला आहे. केंद्र सरकारचे धोरण हे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणारे ठरू लागले आहे. मागील वर्षी संजय साठे यांनी मातीमोल भावाने विकलेल्या कांद्याच्या पैशांची मनिऑर्डर पंतप्रधानांना केली होती.

आज पुन्हा शेतकर्‍यांच्या व्यथा सरकार दरबारी पोहचाव्या म्हणून त्यांनी आपल्या कांदा चाळीला सजवून साठे दाम्पत्याने या कांद्याची विधीवत पूजा करत सरकारला शेतकर्‍यांसाठी चांगले निर्णय घेण्याची बुद्धी दे असा संदेश दिला आहे. बाहेरचा कांदा आपल्या देशात नको. आपल्याला पुरेल इतका कांदा आपल्या देशात असतांना कांदा आयातीचा अट्टाहास कशासाठी. हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना कांदा द्यायला हवा.

शेतकरी रात्रंदिवस शेतीची मशागत करतो. महागडे बियाणे, खते, औषधे घेऊन कांद्याचे पीक घेतो. मात्र या पीकाला अनेकवेळा निसर्गाचा फटका बसतो. त्यातच आता जे पीक हातात येते त्याला शासनाच्या निर्णयामुळे मातीमोल भावाने विकण्याची वेळ येते. एकीकडे केंद्र सरकार परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची भाषा करते तर दुसरीकडे परदेशातून कांदा आणून स्वत:च्याच धोरणांना हरताळ फासल्यो केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचे साठे म्हणाले. शेतकरी अवघ्या जगाचा पोशिंदा आहे. आपल्या देशाचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी धोरणाला प्राधान्य द्यावे असेही संजय साठे यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com