कांदा लागवडीस प्रारंभ

दमदार पावसाने काटवन परिसराला दिलासा
कांदा लागवडीस प्रारंभ

मालेगाव । प्रतिनिधी Nashik

जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत नियमित सातत्य ठेवले आहे. वरूणराजाच्या या कृपेने खरीप हंगाम चांगलाच बहरत असल्याने बळीराजा सुखावला आहे. कांदा लागवडीत नेहमीच अग्रेसर राहणार्‍या काटवन भागाने यंदा देखील कांदा लागवडीस प्रारंभ करत तालुक्यात आघाडी घेतली आहे. दमदार पावसामुळे भाव मिळेल या आशेवर यंदा देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड उत्पादकांतर्फे केली जात आहे.

काटवन व कांदा हे गेल्या अनेक वर्षांपासून समीकरण बनले आहे. यंदा देखील काटवन परिसरात कांदा पिक मोठ्या प्रमाणात घेण्याचा कल शेतकर्‍यांचा दिसून येत आहे. प्रत्येक बागायती शेतात कांदा पिक कमी अधिक प्रमाणात दिसत असते. खरीप पिकांनी शेते भरलेली असली तरी कांद्यासाठी शेतजमीन मोकळी ठेवलेली असते. भावात चढउतार होत असला तरी नगदी पिक म्हणून कांद्याकडे शेतकरी मोठ्या आशेने बघत असतात.

परिसरात बाजरी, ज्वारी, भूईमूग आदि पारंपरिक पिकांची जागा कांदा, मका, फळपिके, भाजीपाला आदि नगदी पिकांनी घेतली आहे. कांद्याच्या चढत्या भावाने अनेकांना तारले तर अनेकांना कर्जबाजारी देखील केले आहे. कांदा बियाणे, रोप तयार करणे, शेतीची मशागत, कांदा लागवड, निंदणी, फवारणी, कांदा काढणे, साठवण, वाहतूक आदि साठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो.

लवकरात लवकर कांदा लागवड करून मोठ्या प्रमाणावर माल येण्याच्या आधीच आपला माल विकला जावा, अशी भावना उत्पादकांची असते. बाजारात कांदा आधी गेल्याने भाव चांगला मिळतो हा त्यामागे उद्देश असतो.

निसर्ग वादळाच्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामाची जय्यत तयारी केलेल्या शेतकर्‍यांनी रोहिणी-मृग बरसताच खरीपाच्या पेरण्या आटोपल्या होत्या. नंतर आद्रा नक्षत्राने देखील हात दिल्याने कांदा लागवडीस उत्पादकांतर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. या लागवडीमुळे रोजगार उपलब्ध होत असल्याने शेतमजुरांना देखील दिलासा मिळाला आहे.

भाव मिळेल ही आशा

कांदा उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. कांदा पिकावरच शेतकर्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून असल्याने कांदा लागवड सुरू झाली आहे. भाव मिळेल ही आशा असल्याचे चिंचव्याचे शेतकरी अरविंद देवरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.