कांदाप्रश्नी तीव्र लढा गरजेचा: बहाळे

कांदाप्रश्नी तीव्र लढा गरजेचा: बहाळे

लाहोणेर । वार्ताहर | Lohoner

शेतकर्‍यांचे हित साधायचे असेल तर सर्वप्रथम शेतकरी (farmers) विरोधी सर्व कायदे कायमचे दूर करण्यासह शेतीमालास योग्य भाव (Fair prices for agricultural commodities) देण्याबाबत टाळाटाळ करणार्‍या शासनाला वटणीवर आणण्यासाठी शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभारावा.

एकमेकांचे उणे-दुणे काढण्याऐवजी कांद्याचा तिढा सोडवण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी (Farmers Associations) मतभेद बाजूला सारून येत्या 15 जूनरोजी येवला येथे होणार्‍या ऐतिहासिक कांदा परिषदेला (Onion Council) हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष ललित पाटील-बहाळे यांनी विठेवाडी येथील गुरूदत्त मंदिरात आयोजित जनजागृती अभियानात बोलताना केले.

कांदा उत्पादक (Onion growers) शेतकर्‍यांना संबोधित करताना बहाळे पुढे म्हणाले, सध्या कोसळलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवर कांद्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. त्याला राजकीय पक्षही अपवाद नाहीत. परंतु ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, ही कांदा उत्पादकांची शोकांतिका आहे. कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा निर्बंध लादले जातात. निर्यात बंदी, साठेबंदी, व्यापार्‍यांच्या घरावर धाडी टाकल्या जातात. कांद्याला (onion) जीवनावश्यक वस्तू कायदा लागू असल्याने थोडे दर वाढले की सरकार बाजार हस्तक्षेप योजनेची अंमलबजावणी सुरू करते.

त्यामुळे भाव खाली येतात. नाफेडची कांदा खरेदी देखील आजच्या घडीला कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक हिताची नाही. ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केलेली ही योजना आहे. त्यात शेतकर्‍यांचा फायदा कमी व शासकीय अधिकारी, दलालांचा फायदा जास्त दिसून येत आहे. येवल्याच्या कांदा परिषदेत नाफेडच्या कथित खरेदीसंदर्भात विस्ताराने चर्चा केली जाणार आहे. नाफेडअंतर्गत कांदा खरेदी अत्यंत छुप्या पद्धतीने सुरू असून प्रोड्युसर कंपन्यांना हाताशी धरून शेतकर्‍यांच्या मालाची लूट सुरू असल्याचे स्पष्ट करत याबाबत थेट दिल्लीपर्यंत जावून कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यास भाग पाडले जाईल, असे त्यांनी सांगितले.

तूट असेल तर लूट आणि मुबलकता असेल तेव्हा लिलाव हा लुटीचा प्रकार कांद्याच्या बाबतीत सातत्याने घडत आहे. कांद्याचे भाव वाढतात तेव्हा सरकारी यंत्रणा खडबडून जागे होते आणि परदेशी कांदा आयात करते. खाण्याच्या लाइकीचाही नसतो असा कांदा बाजारात उपलब्ध करून भाव पाडले जातात, असे शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शंकर ढिकले यांनी सांगितले. शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी हे विठेेवाडी येथे स्व. दोधा कृष्णा जाधव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले होते तेव्हापासून हा परिसर शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असल्याचे निदर्शनास आणून दिले.

कांद्याचा समावेश शेतीमालाच्या संरक्षक पिकांमध्ये करावा, इतर नाशवंत पिकांच्या यादीत कांद्याचा समावेश करुन संरक्षीत पिक मान्यता देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावा, असे आवाहन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी केले. यावेळी सुतगिरणीचे माजी चेअरमन दिनकर जाधव, व्यंगचित्रकार किरण मोरे, माणिक निकम यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते शांताराम जाधव होते. वसाकाचे माजी उपाध्यक्ष फुला जाधव, बाळासाहेब शेवाळे, शिवसेनेचे सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव निकम, बाळासाहेब निकम, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब शेवाळे, शैलेंद्र कापडणीस, धना निकम, सोसायटी अध्यक्ष प्रशांत निकम, बाबूराव पेठकर, विलास निकम, पंडित निकम, महेंद्र आहेर, योगेश आहेर, मिलिंद निकम, प्रविण निकम, पप्पू निकम, संदेश निकम, समाधान निकम, वंसत निकम, तानाजी निकम, दीपक पवार, अशोक देवरे, संजय सावळे, बाळू निकम, माणिक देवरे, शंकर निकम, रामदास निकम, कैलास कोकरे, शांताराम निकम, आदिंसह विठेेवाडी, भऊर, खामखेडा, सावकी, बेज, बगडू परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com