नाशिक । प्रतिनिधी

सलग दहा दिवसानंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. मात्र,दहा दिवसांच्या नंतर बाजार समित्या सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागली आहे.परिणामी कांद्याचे दर घसरले आहेत.

संपत आलेले आर्थिक वर्ष, परिणामी बँकांचे बंद असलेले व्यवहार, त्यामुळे रोख रक्कम मिळण्यात येणाऱ्या अडचणी, मजुरांची वानवा अशा विविध कारणांमुळे व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांकडे कामकाज बंद ठेवण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार 27 मार्चपासून जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते.

मात्र,सलग दहा दिवसानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सोमवारपासून सुरू झाले आहेत. मात्र, दहा दिवसांच्या नंतर बाजार समित्या सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागली आहे. यामध्ये रांगडा (लेट खरीप) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. उन्हाळ कांद्याची आवक तुलनेने कमी आहे मात्र, कांद्याला आवक वाढल्यामुळे प्रति क्विंटल 900 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे.

कांदा उत्पादकांचे दुहेरी नुकसान

जिल्ह्यातील रांगडा (लेट खरीप) कांदा हा मार्चच्या मध्यापर्यंत मार्केटमध्ये विक्रीस येतो.त्यानंतर उन्हाळी कांद्याला सुरुवात होते. मात्र,अजूनही लेट खरीप कांद्याची आवक सुरूच आहे. त्यातच यावर्षी उन्हाळी कांद्याच्या बियाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालीआहे. उन्हाळ कांद्याचे बी म्हणून लेट खरीप कांद्याचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात अालेली आहे.

परिणामी लेट खरीप कांद्याचे अतिरिक्त उत्पादन यावर्षी होणार असल्यामुळे एप्रिलच्या मध्यापर्यंत या कांद्याची आवक होणार आहे. लेट खरीप कांद्याची टिकवण क्षमता नसल्यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना विकावाच लागणार आहे.मात्र,या कांद्याची प्रतवारी करताना मोठ्या अडचणी शेतकऱ्यांसमोर येत आहेत.

शेतकऱ्यांची बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध बाजार समित्या सुरू होताच मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. लेट खरिपाचे अधिक तर उन्हाळ कांद्याची आवक अल्प प्रमाणात आहे.परिणामी लेट खरीप कांद्याला दर अत्यंत कमी मिळत आहेत.यामुळे कांदा उत्पादकांचे दुहेरी नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पारंपारिक बंद ठेवण्याचे स्वरूप बदलावे

करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत. यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत.त्यातच बाजार समित्यांचे कामकाज जास्त दिवस बंद राहिल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.यामुळे शेतकऱ्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पारंपारिक बंद ठेवण्याचे स्वरूप बदलून बाजार समित्या बंद ठेवण्याचे दिवस कमी करावे. म्हणजे मार्केट सुरू झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणात वाढणार नाही आणि त्याचे परिणाम दर कमी होण्यावर होणार नाही.

-संजय बोराडे,कांदा उत्पादक