कांदा निर्यातबंदी विरोधात सोशल मीडिया आंदोलन

कांदा निर्यातबंदी विरोधात सोशल मीडिया आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी Onion Export Ban करून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे.

सन 2013- 14 मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आधार घेऊन देशभरामध्ये शेतकरी व शेती विकासाचे स्वप्न दाखवून केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आले.

परंतु , सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार त्यांच्याच कृतीतून दिसून आले आहे.त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा विषय आम्ही संपूर्ण जगात घेऊन जाणार असून सोशल मिडीया आंदोलन करणार आहोत. अशी माहिती राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.

निर्यातबंदीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लाखो कांदा उत्पादक शेतकरी शनिवारी ( दि.१९) फेसबुक लाईव्ह, रविवारी (दि.२०) व्हाट्सअप मेसेज, सोमवारी ( दि.२१)ट्विटर मोहीम,मंगळवारी ( दि.२२) इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरून केंद्राच्या या निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन छेडतील.

लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कांदा सलग पाच ते सहा महिने 500 ते आठशे रुपये प्रति क्विंटल या दराने म्हणजे उत्पादन खर्चाच्या निम्या भावाने विकला गेला होता. तेव्हा सरकारने कांद्याचे दर वाढण्यासाठी कोणती हालचाल केली नाही.

परंतु ,आता 14 सप्टेंबर 2020 रोजी कांद्यावर निर्यातबंदी करताना 2 तासात ही निर्यात बंदी केली आहे.म्हणजे निर्यात बंदी करत असताना 2 तासात निर्यात बंदी करायची परंतु निर्यात बंदी हटवताना पंधरा- पंधरा दिवसाची मुदत द्यायची.केंद्र सरकारच्या निर्यातीतील धरसोड वृत्तीचा कांदा उत्पादकांना आर्थिक फटका बसत आलेला आहे.

राज्यात रस्ता रोको, वेगवेगळे आंदोलने व मोर्चे काढून केंद्र सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जात नसल्याने शनिवारपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी आपल्या मोबाईल मधून फेसबुक लाईव्ह करून रविवारी 20 सप्टेंबरला आपापल्या मतदारसंघातील आमदार, खासदार मंत्री विरोधी पक्षनेते यांना व्हाट्सअप मेसेज करतील.

सोमवारी 21 सप्टेंबरला पंतप्रधान केंद्रीय कृषिमंत्री केंद्रीय वाणिज्य मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांना टॅग करून ट्विट करतील.

यावेळेस #justiceforonionfarmers हा हॅशटॅग वापरुन राज्यभरातील लाखो कांदा उत्पादक ट्विट करतील.

मंगळवारी 22 सप्टेंबरला इंस्टाग्राम युट्युबवरून कांदा उत्पादक शेतकरी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी करतील.

निर्यात बंदीचा विषय जगात घेऊन जाणार

कांदा निर्यातबंदीला विरोध करतांना राज्यभरात रास्ता रोको मोर्चे जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्याबरोबरच जगातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनाही केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजाव्या.

यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारने केलेल्या या निर्यात बंदीची माहिती दिली जाणार आहे.

विदेशात असलेल्या भारतीयांनीही केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी, असे साकडे घालावे. यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी विदेशी भारतीयांना आवाहन करतील,असेही भारत दिघोळे यांनी सांगितले .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com