लासलगाव येथे अमावस्येलाही कांदा लिलाव होणार
लासलगाव। वार्ताहर
गेल्या अनेक वर्षांपासुन अमावस्येला बंद असलेल्या कांदा लिलावाबरोबरच प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चन्टस् असोसिएशनच्या सभासदांनी घेतला असल्याची माहिती लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समिती संचालक नंदकुमार डागा यांनी दिली आहे.
सध्या बाजार समितीच्या आवारावर उन्हाळ कांदा विक्रीस येत असून पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांचेकडील कांद्याची विक्री करणेसाठी घाई करीत आहे. परंतु गेल्या महिन्यात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव साधारणतः 24 दिवस बंद होते.
त्यामुळे शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन परीसरातील शेतकरी बांधवांबरोबरच लासलगाव बाजार समितीच्या गेल्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून लासलगाव मर्चन्टस् असोशिएशनच्या सभासदांनी अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढीत येत्या अमावस्येपासून प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला असून शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा योग्य प्रतवारी करून वरील दिवशी विक्रीस आणावा असे आवाहन व्यापारी गटाचे संचालक नंदकुमार डागा यांनी केले आहे.