सिद्धपिंप्रीत होणार एक हजार वृक्षलागवड

ऑक्सिजन पातळी वाढण्यासाठी तरूणाचा निर्धार
सिद्धपिंप्रीत होणार एक हजार वृक्षलागवड

सिद्धपिंप्री । Niphad

बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून सध्या करोना संसर्गामुळे देशभरात रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला ऑक्सिजन पुरवठा करणे अवघड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल साधण्याबरोबरच वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे यासाठी सिद्धपिंप्री गाव व परिसरात एक हजार पेक्षा जास्त ऑक्सिजन देणार्‍या झाडांची लागवड करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षापासून जंगले नाहिशी होऊन त्या ठिकाणी जमिनींसह मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहे. झाडांच्या बेसुमार कत्तलीमुळे निसर्गचक्र कोलमडून पडले असून सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. सध्या अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडत आहेत.

साहजिकच हीच बाब हेरून पर्यावरणाचा समतोल साधण्याबरोबरच हवेत ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढले पाहिजे यासाठी सिद्धपिंप्री गावाने वृक्षलागवड मोहिम राबविण्याचे ठरवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामस्थांनी गाव व परिसरात एक हजारांपेक्षा जास्त ऑक्सिजन देणार्‍या झाडांची लागवड सुरू केली आहे. यात प्रामुख्याने वड, पिंपळ, लिंब, बांबू, चिंच, बदाम, पेरू, सिताफळ आदींसह विविध झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

तज्ञांच्या मते ज्या झाडांना जास्त पाने असतात अशी झाडे लागवड करावी. त्यामुळे गावात ऑक्सिजन देणार्‍या झाडांची लागवड करण्यात येत आहे. गावातील वृक्षप्रेमी रामा ढिकले याने वृक्षलागवड मोहिमेला सुरुवात केली असून पहिल्या वडाच्या झाडाची लागवड करुन इतरांनाही प्रोत्साहीत केले आहे.

ढिकले हा गावापासून 2 कि.मी. त्याच्या वस्तीवर राहतो. दररोज 2 कि.मी. पायी येत वड, पिंपळ, लिंब अशा झाडांची तो लागवड करीत आहे. गावात ऑक्सिजन कसा खेळता राहिल याकडे लक्ष देण्याचा मानस असल्याचे ढिकले सांगतो.

यासाठी त्याला मित्रांचे सहकार्य लाभत आहे. या उपक्रमाचे जि.प. सदस्य यशवंत ढिकले, सरपंच मधूकर ढिकले, पो.पा. कैलास ढिकले, आंबादास ढिकले, राहूल ढिकले, आनंदा ढिकले, दिलीप ढिकले यांनी स्वागत केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com