
नवीन नाशिक | प्रतिनिधी
आईला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरत अल्पवयीन मुलाने त्याच्या सहकाऱ्यांसह कंपनीच्या व्यवस्थापकाचा तलवारीने व चॉपरने वार करत निर्घृण खून ( Murder ) केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. घटना घडल्यावर अवघ्या काही तासांत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अंबड औद्योगिक वसाहतीत एस ए २ सेक्टर मधील आहेर इंडस्ट्रीज ( Aaher Industries ) या कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार निवृत्ती आहेर ( Nandkumar Nivruttee Aaher ) (५०,रा. महात्मा नगर,नाशिक ) हे (दि. ७) सकाळी १० वाजेच्या दरम्यान कंपनीत त्यांच्या चारचाकीने आले दरम्यान दुचाकीवर आलेल्या चार मुलांनी त्यांच्यावर तलवारीने व कोयत्याने वार केले.
आहेर यांच्यावर वार करत असतांना चार जणांपैकी एकाच्या पायाला चॉपर लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र अशा परिस्थितीत चारही जणांनी घटना स्थळावरून पोबारा केला.आहेर यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,उपायुक्त विजय खरात,उपायुक्त अमोल तांबे,सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ,अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदन बगाडे,पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर,सपोनी गुन्हे गणेश शिंदे,सपोनी वसंत खतेले,उपनिरीक्षक नाईद शेख,संदीप पवार,उत्तम सोनावणे आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
आहेर यांचा खून नक्की कोणत्या कारणासाठी झाला यादृष्टीने पोलीस तपास करत असतांना मारेकऱ्यांपैकी एकास गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळताच नाशिक शहर व परिसरातील डॉक्टरांना पोलिसांनी विश्वासात घेऊन सदर प्रकाराबाबत माहिती देऊन संबंधित तरुण दिसल्यास कळविण्याचे आवाहन केले.
यावरून सदर तरुण हा एका रुग्णालयात उपचार घेत असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलाला विचारणा केली असता त्याने व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मिळून हा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान अन्य तिन संशयित फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केले आहेत.