
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad
येथील मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) वैद्यकीय उपचारासाठी जात असलेल्या एका कैद्यावर दोन जणांनी पाठीमागून हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला असून या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था काय करते? याबाबत जोरदार चर्चा आहे...
याबाबतचे वृत्त असे की, मध्यवर्ती कारागृहात अमीन शमीन खान उर्फ मुर्गी राजा हा कैदी गेल्या काही दिवसांपासून कारागृहात आजारी आहे. त्यामुळे तो वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी निघाला होता.
खान हा कारागृहातील कॅन्टीन समोर आला असता अचानकपणे पाठीमागून हुसेन फिरोज शेख व तेजस अनिल गांगुर्डे हे दोन कैदी आले व त्यांनी खान याच्या डोक्यात व डोळ्यावर फरशी फेकून मारली.
त्यामुळे खान हा गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा काय करते? असा असावा चर्चेला जात आहे.
याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात अमीन शमीम खान याने तक्रार दाखल केली असून शेख व गांगुर्डे या दोन कैद्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके व कुऱ्हाडे हे करीत आहे.