नाशिक | Nashik

करोनामुळे व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने ही प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी सीईटी सेलने नियमावली जाहीर केली आहे.

त्यामध्ये इंजिनिअरींग, फार्मसीसह सर्वच अभ्यासक्रमासाठी दोन प्रवेश फेऱ्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली आहे.

इंजिनिअरिंग प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मसी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मा डी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश, बॅचलर ऑफ प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दोन प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.

यामध्ये विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांपर्यंत पसंतीक्रम देता येतील, पण दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना जेथे प्रवेश मिळेल तेथे जागा निश्चित करावी लागणार आहे. सीईटी सेलने नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

यंदा करोनामुळे शैक्षणिक प्रक्रिया जुलै-ऑगस्ट ऐवजी डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष देखील कोलमडले आहे. आता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सीईटी सेलने पाऊल उचलले आहे.