
वलखेड | वार्ताहर | Valkhed
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) वलखेड फाटा (Valkhed Phata) येथे अल्टोकार, पिकअप व मोटरसायकल यांचा तिहेरी अपघात होऊन पिकअपमधील एकाचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास माधव शिंदे (रा. रवळस ता. निफाड) असे अपघातात (Accident) मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून ते वणी येथील ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आज सोमवार (दि.२४) रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शिंदे हे नाशिकहून वणी (Vani) येथे अल्टोकार (एमएच १५ सीएम ४४७४) ने जात होते.
त्यावेळी वणीहून दिंडोरीकडे जाणारी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १५ ईजी ५८३०) ही अल्टोकारला धडकली. त्याचवेळी पाठीमागून येणारी मोटरसायकल स्प्लेंडर प्रो (एमएच १५ डीएच ४९३१) ही देखील पिकअप आणि अल्टोकारला धडकली. त्यामुळे तिहेरी अपघात झाला. या अपघातात रामदास शिंदे हे जागीच ठार झाले. तर मोटारसायकल चालक विठ्ठल पंढरीनाथ पागे (आंबेवणी) हे गंभीर जखमी (Wounded) झाले.
दरम्यान, मयत शिंदे यांचा उद्या मंगळवार दि.२५ रोजी वणी येथे रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. मात्र, त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने शिक्षक वर्गात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी. बी. जाधव, पोलीस नाईक एस. के. कडाळे करत आहेत.