देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी; १९५४ साली गावात आलेल्या कुटुंबाने केली लाखमोलाची मदत

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी; १९५४ साली गावात आलेल्या कुटुंबाने केली लाखमोलाची मदत

मनखेड | भागवत गायकवाड

'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी' या ग. दि. माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय आज सुरगाण्यात आला. एक मारवाडी कुटुंब १९५४ साली तालुक्यातील उंबरठाण येथे वास्तव्यास आले होते. आदिवासी समाजबांधवांशी त्यांची नाळ इतकी जुळली की त्यांच्या उपकाराची परतफेड या कुटुंबाने कुठल्या ना कुठल्या माध्यमांतून नेहमीच केली. सध्या करोनाकाळात तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरु झाले, या सेंटरला या कुटुंबाने कुणीही मदत न मागता लाखमोलाची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांनी एक शालेय मित्र म्हणून आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत मुक्तहस्ते निधी दिल्याने आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यास देणगीतून हातभार लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमारे 1954 साली राजस्थानातील मारवाड जंक्सन तालुक्यातील सिरियारी या छोट्याशा गावातून जिल्हा पाली येथून रोजी रोटीच्या शोधार्थ व्यापारानिमित्ताने एक मारवाडी कुटूंब सोहनदास वैष्णव हे पत्नी शांतीदेवी सोबत येथे आले होते.

त्याकाळी खेडोपाडी रस्त्याची वाणवा, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण अशा कितीतरी अडचणींना सामोरे जात हे कुटुंब उंबरठाण येथे स्थायिक झाले. सुमारे सत्तर वर्षापासून या मारवाडी कुटुंबाची नाळ आदिवासी समाजाशी जुळली होती.आज जरी ते उंबरठाण येथे नसले तरीदेखील गुजरात सिमेवरील निंबारपाडा येथे व्यवसाय करीत आहेत.

तरी'अहिंसा परमो धर्म. मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा' या उक्तीनुसार गोपाळदास वैष्णव यांनी वडील दिवंगत सोहनदास वैष्णव यांच्या स्मृती पित्यर्थ "सुरगाणा कोविड19 जननिधीत रुग्णांच्या सेवेसाठी एक लाख रुपये देणगी धनादेशद्वारे तहसिलदार किशोर मराठे यांच्याकडे सुपूर्द केले.

दीड वर्षापासून व्यवसाय बंद असूनही निधी दिल्याने या मारवाडी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कुटुंबाने दुष्काळ उपासमारीच्या काळात आदिवासी समाजा करीता अनेक वेळा माणुसकी दाखवत मदतीचा हात पुढे केला होता.

गोपाळदास वैष्णव यांनी जिल्हा परिषदेच्या गरजू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य तसेच बाक दिले आहेत. देवीपाडा येथील मरदेवी मंदिर, उंबरठाण येथील जामा मस्जिद, निंबारपाडा येथील मारुती मंदिर या ठिकाणी भाविकांच्या बैठकीसाठी बाक दिले आहेत.

तर अयोध्या येथील राम मंदिराकरीता एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे. अतिदुर्गम तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना तालुका शिक्षक, शिक्षण विभाग, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पंचायत समितीचे महसूल विभाग एकत्र येत कोविड जन निधी जमा करीत कोविड रुग्णासाठी सुरगाणा रुग्णालयात सुसज्ज 30ऑक्सिजन खाटांची उभारणी करण्यात आली आहे.

अनेक दानशूर व्यक्तींनी वेळीच मदतीचा हात पुढे केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन खाटा शोधण्याची धावपळ थांबली आहे. सोशल मीडियाच्या 'कोविड देवदूत मदत निधी' गृपच्या माध्यमातून तुकाराम अलबाड, रामभाऊ थोरात, भगवान आहेर, ग्रामसेवक वसंत भोये, एकनाथ बिरारी, रतन धुम, डॉ.सुरेश पांडोले, डॉ.दिनेश चौधरी, डॉ. कमलाकर जाधव, डॉ. प्रविण पवार, कृषी सहायक गुलाब भोये, भास्कर चौधरी, शिक्षक पांडुरंग पवार, रतन चौधरी, मनोहर चौधरी, भास्कर बागुल, एन.एस.चौधरी, नाना ढुमसे, केशव महाले, देविदास देशमुख, पांडुरंग वाघमारे, तुकाराम भोये, मोतीराम भोये, सुधाकर भोये, राजेंद्र गावित, राजू चौधरी हे आवाहन करीत असून दानशूरांनी उत्तम प्रतिसाद देत वीस ते पंचवीस दिवसात जननिधी खात्यात लाखो रुपये जमा झाले आहेत.

आमचे कुटूंब सुमारे सत्तर वर्षापासून अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसमवेत राहात असल्याने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञ संवेदनशील भावनेने कमविलेला थोडासा हिस्सा गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरीता कठीण प्रसंगात उपयोग व्हावा या करीता मदतीचा हात पुढे केला आहे.

गोपाळदास वैष्णव, मारवाड राजस्थान पाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com