खासदार गोडसेंकडून स्वखर्चाने शंभर ऑक्सिजन सिलेंडर

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात होणार लोकार्पण
खासदार गोडसेंकडून स्वखर्चाने शंभर ऑक्सिजन सिलेंडर

देवळाली कॅम्प | Deolali Camp

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोना संसर्ग आजाराने थैमान घातले आहे.

अशा परिस्थितीत रुग्णांना पुरेसा ऑक्सिजची उपलब्धता होत नसल्याची दखल घेवून खासदार हेमंत गोडसे यांनी स्वखर्चातून शंभर ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले आहेत. त्यांचे वितरण उद्या रविवार (दि.२५) सकाळी अकरा वाजता शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात होणार आहे.

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोनाने थैमान घातले आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असून त्यांच्या नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

खा. गोडसे यांनी यापूर्वी दोन टप्यात 10 हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा देखील उपलब्ध करुन दिली आहेत. सतत रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या खा. गोडसे यांनी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेवून स्वत: सह दीपक चांदे व इतर मित्र परिवाराच्या मदतीने शंभर ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी केली आहे.

ही ऑक्सिजन सिलिंडर गरजू रुग्णांना शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून एन.जी.ओ. मार्फत वाटप करण्यात येणार असून रविवारी (दि.२५) सकाळी अकरा वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सिलींडरचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

यावेळी खा. गोडसे यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुनिल बागुल, वसंत गिते, विलास शिंदे, सचिन मराठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमावेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पुरेपूर पालन करण्यात येणार आहे. खा गोडसे यांच्या सामाजिक उपया अभिनव उपक्रमाचे जनतेकडून स्वागत होत आहे.

जिल्हातील करोना बाधितांसाठी अजुनही काही ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com