
सिन्नर। वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील पंचाळे-कोळपेवाडी (Panchale-Kolpewadi) रस्त्यावरील शिंदेवाडी फाट्याजवळ दुचाकीने (Bike) जात असलेल्या पंचाळे येथील कृष्णा दत्तू थोरात (२३) याच्या अंगावर हायवा (ट्रक) घालून व लोखंडी रॉडने मारहाण (Beating with Iron Rod) करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली...
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा व त्याचे मित्र रोशन खाडे, विशाल आहेर हे आपला मित्र केशव हांडोरे याच्या वाढदिवसानिमित्त रात्री परिसरातील कुबेर हॉटेल येथे जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर चौघेही तरुण आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. १५ जे. जे. ५०२८ व एम. एच. १५ इ.सी. ३७०५ ने पंचाळेकडे घरी जाण्यास निघाले होते. यावेळी संशयित आरोपी भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर रा. शहा याचा कृष्णाला फोन आला व तो कृष्णाला शिवीगाळ करू लागला. तुमच्यामुळेच माझ्यावर पोलीस केस झाली आहे असे सांगून तुम्हाला प्रत्येकाला कल्पेश आंधळे याच्यासारखे गाडीखाली घालून मारून टाकतो असा दम दिला.
त्यानंतर फोन ठेवल्यावर काही वेळातच संशयित आरोपी (Suspect Accused) भैया व त्याचा मित्र ओमकार कांदळकर रा. शहा हे दोघे हायवा क्रमांक एम.एच. ०६ ए.सी. ६१२४ घेऊन कृष्णा व त्याच्या मित्राच्या पाठीमागून आले. काही कळण्याच्या आतच भैय्याने हायवा कृष्णा व त्याच्या मित्राच्या दुचाकीवर चढवला. यामुळे कृष्णा व त्याचे मित्र दुचाकीसह रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. भैया व ओमकारने पुढे काही अंतरावर हायवा थांबवत लोखंडी रॉड काढून कृष्णाला रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.कृष्णाच्या डोक्याला रॉड लागल्याने तो जखमी (Injured) झाला.
दरम्यान, यावेळी संशयित आरोपी भैयाने कृष्णाला शिवीगाळ करत 'आता तू वाचला मात्र, पुढच्या वेळी मारून टाकतो' असा दम देत तेथून पोबारा केला. यानंतर कृष्णाला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कृष्णाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) संशयित आरोपी भैय्या कांदळकर व ओमकार कांदळकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.