ऑक्सिजन प्रकल्पासाठी दीड कोटीचा निधी

भारत प्रतिभूती मुद्रणालयाचा पुढाकार
ऑक्सिजन प्रकल्पासाठी दीड कोटीचा निधी

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाने सामाजिक बांधिलकी म्हणून सिन्नर, इगतपुरी, आणि देवळाली कॅम्प कॅन्टोमेन्ट बोर्ड या तीन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी एकूण 1 कोटी 59 लाख, 30 हजाराचा निधी मंजूर केला आहे. तिन्ही रुग्णालयांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये प्रकल्पासाठी देण्यात येणार आहेत.

खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रेस व्यवस्थापनाला याबाबत पत्र देऊन आवाहन केले होते. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांनी पाठपुरावा केला.

प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक दुर्गा प्रसाद यांनी मंजुरीचे पत्र पाठवले. त्यांच्यासह महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्रा घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजयकुमार अग्रवाल, आयएसपीचे मुख्य व्यवस्थापक सुधीरकुमार साह यांचे मजदूर संघाने आभार मानले.

गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रकोप वाढला आहे. नाशिकमध्ये सरकारी रुग्णालयांसह खासगीमध्ये मोठी गर्दी होत आहे. अनेकदा ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे.

ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यामुळे रुग्ण दगावत आहेत. याची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. प्रेसच्या सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदायित्व निधी) देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्ड, सिन्नर, इगतपुरीतील सरकारी रुग्णालायांमध्ये आक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी मदत करण्याची विनंती केली. त्यास प्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com