
नाशिक | प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्यांतर्गत क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या पुढाकारातून एकाच दिवशी, एकाच वेळी हजारो जणांनी स्वच्छतेची शपथ घेण्याचा उपक्रम शुक्रवारी(दि.२९) सकाळी अकरा वाजता नाशिक शहरातील शासकीय कार्यालये, विविध शाळा आणि खासगी आस्थापनांमध्ये राबविण्यात येणार आहे.
नाशिकला देशातील पहिली क्वालिटी सिटी बनविण्याच्या दृष्टीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहभागाने हाती घेण्यात आलेल्या क्वालिटी सिटी नाशिक या अभियानातील तीन प्रमुख उद्दिष्टांपैकी स्वच्छता हे एक आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सध्या स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून दि. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने त्याची सांगता होणार आहे.या पंधरवड्यानिमित्त क्वालिटी सिटी नाशिक अभियानाअंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार स्वच्छतेची शपथ या उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाला शासकीय स्तरावरून बळ मिळाले असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तसे पत्र जिल्हाधिकारी यांनी पाठवले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदींना या उपक्रमात सहभागी होण्याबाबत पत्र पाठवले आहे.
महानगरपालिका शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनीही महानगरपालिका क्षेत्रातील शाळांनी असे पत्र पाठवून स्वच्छतेची शपथ घेण्याबाबत सूचित केले आहे. क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या सामंजस्य करारामध्ये सहभागी झालेल्या संस्था आणि संघटना तसेच त्यांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या आस्थापनांमध्येही शपथ घेण्यात येणार आहे.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गंगापूर रोडवरील कँपसमध्ये शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या सुकाणू समितीचे सदस्यही तिथे उपस्थित राहणार आहेत. नाशिककरांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकला अव्वल स्थानी नेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ताकद लाभणार आहे.
अधिकाधिक नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन क्वालिटी सिटी नाशिक अभियानाकडून करण्यात आले आहे. सामुहीकरित्या स्वच्छतेची शपथ घेतल्याचे फोटो आणि व्हिडीयो qualitycitynashik@gmail.com या मेल आयडी वर पाठवावे अथवा ७०२११७४९८१ या नंबरवर पाठवावेत, असेही कळविण्यात आले आहे.
स्वच्छतेची शपथ
महात्मा गांधीनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हे तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसीत देशाची कल्पनाही होती. आपल्या देशाला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. मी शपथ घेतो की, मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहील आणि त्यासाठी वेळही देईल.
दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवडयातून २ तास श्रमदान करुन स्वच्छतेच्या या संकल्पाला पुर्ण करीन. मी माझ्या घरात, कामाच्या ठिकाणी, आजुबाजुच्या परिसरात निर्माण होणार्या कचर्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत, सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत व घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीत टाकेन.
त्याप्रमाणे प्लास्टीक कॅरीबॅग तसेच सिंगल युज प्लास्टिक आणि थर्माकॉल पासून बनवण्यात येणार्या वस्तुंचा वापर करणार नाही व ओल्या कचर्याचे घरातच होम कंपोस्टींग करून शहराच्या स्वच्छतेस हातभार लावेन. मी शपथ घेतो की, मी कोठेही उघड्यावर कचरा फेकणार नाही व कोणाला फेकू देणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, स्वच्छतेसाठी मी उचललेल्या प्रत्येक पावलामुळे माझे शहर व माझा देश स्वच्छ होण्यास मदत होईल. जय हिंद जय भारत.