अ‍ॅन्टीजेन चाचणीत पहिल्या दिवशी ९ संशयित पॉझिटीव्ह

वडाळागांव व फुलेनगर भागात ९१ जणांची चाचणी
अ‍ॅन्टीजेन चाचणीत पहिल्या दिवशी ९ संशयित पॉझिटीव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना विषाणुचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता आसीएमआर यांच्याकडुन मिळालेल्या ९ हजार अ‍ॅन्टीजेन कीटच्या माध्यमातून शहरातील करोना बाधीतांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्ती व वृध्दांच्या चाचण्यांना प्रारंभ करण्यात आला आहे. बुधवारी (दि.८) रोजी दिवसभरात ९१ अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यात आल्यानंतर यात ९ जण पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे.

या पाझिटीव्ह रुग्णांंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चाचणीमुळे तत्काळ अहवाल प्राप्त होत असल्याने संशयित व बाधीतांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका क्षेत्रात बाधीत रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीच्या व्यक्ती पुढे बाधीत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे वाढते संक्रमण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाला ९ हजार अ‍ॅन्टीजेन टेस्ट किट प्राप्त झाले आहे. या किटचा वापर आता महापालिका आरोग्य व वैद्यकिय विभागाकडुन हॉटस्पॉट असलेल्या वडाळागांव परिसर, फुलेनगर मायको दवाखाना या भागातील अति जोखमींच्या व्यक्तींचे स्क्रिनींग करण्यासाठी सुरू करण्यात झाला आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात वडाळा गाव व फुलेनगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करण्यात आली. दिवसभरात एकूण ९१ जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ९ जणांचे अहवाल बाधित म्हणून आलेले आहेत. यात वडाळागाव येथे १२ पैकी ३ व मायको दवाखाना पंचवटी येथे ७९ पैकी ६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले. या तपासणीनंतर पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना शासन नियमानुसार दवाखान्यात भरती करणे अथवा योग्य सोय असल्यास व लक्षणे नसल्यास घरीच आयसोलेशन करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही तपासणी सर्व नागरिकांसाठी नसून फक्त बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती व वृद्ध नागरिक तसेच विविध आजारांनी त्रस्त नागरिक याच नागरिकांसाठी असल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com