नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

रिपब्लिकन पार्टी आँँफ इंडिया आठवले गटाकडून येत्या २ मार्चला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन चोपडा लाॅन्स येथे साजरा केला जाणार असून केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा होणार आहे.

दलित समाजाला माणसासारखी वागणूक मिळावी यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा लढा उभारला होता. नाशिक जिल्हा या चळवळित अग्रस्थानी होता. नाशिक शहरातील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या लढ्याचे प्रतिक होते. काळाराम मंदिरात हिंदूं प्रमाणे दलित बांधवाना प्रवेश मिळावा यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता.

त्याची परिणिती म्हणजे दलित बांधवाना काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला. समतेच्या लढाईचे हे यश दलित बांधवांकडून दरवर्षी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे दरवर्षी या ऐतिहासिक घटनेच्या निमित्त नाशिकमध्ये अभिवादन दिनाचे आयोजन करतात.

यंदा देखील प्रकाश लोंढे यांनी येत्या २ मार्चला दुपारी ४ वाजता गंगापूर रोड येथील चोपडा लाॅन्स येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले आहे. केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे काळराम मंदिर सत्याग्रहात योगदान दिलेल्या बांधवांना अभिवादन करुन उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा समतेच्या लढाईतील सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा अध्याय आहे. दरवर्षी रिपाइंकडून हा दिवस जोरात साजरा केला जातो. यंदा दोन मार्चला अभिवादन सोहळा होणार असून केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले त्यासाठी उपस्थित राहणार आहे.
प्रकाश लोंढे, जिल्हाध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)