
नाशिक । प्रतिनिधी| Nashik
जुन्या पेन्शनसाठी सर्व संवर्गीय कर्मचारी एकवटले असून विविध संवर्गीक कर्मचाऱ्यांनी बुधवार दि.१४ मार्चपासून होणाऱ्या संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष महेश आव्हाड यांनी केले आहे.
शासकीय सेवेत सन २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी,यासाठी संपाचा निर्धार पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांनी केला आहे, असे आव्हाड म्हणाले.
पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. पण महाराष्ट्र हे सदन राज्य असतानाही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय का घेत नाही ?,असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता आरपारची लढाई लढण्यासाठी सर्व संघटना सज्ज होऊन संप यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने संपात सहभागी व्हावे,असे आवाहनही आव्हाड यांनी केले आहे.