‘स्मार्ट सिटी’बाबत आज ऑफलाईन बैठक; लोकप्रतिनिधी मांडणार गार्‍हाणे

‘स्मार्ट सिटी’बाबत आज ऑफलाईन बैठक; लोकप्रतिनिधी मांडणार गार्‍हाणे
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात स्मार्ट सिटी कंपनी (Smart City Company) अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे अवघ्या नाशिककरांना त्रास सहन करावा लागत आहे....

मागील कित्येक महिन्यांपासून स्मार्ट सिटी कंपनीला कामे मनमानी पद्धतीने न करता व्यवस्थितपणे करण्याच्या सूचना करण्यात आल्या, तरी कंपनीच्या कामात बदल झालेला नाही.

दरम्यान काल कंपनी संचालकांची ऑनलाईन बैठक झाली, तर आज (दि.28) दुपारी चार वाजता महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात ऑफलाईन बैठक होणार आहे.

दरम्यान आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत विशेष असा काही तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या अध्यक्षांनी तक्रारीबाबत स्थानिक पातळीवरच त्याचा निपटारा करा, अशी सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान उद्या महापालिकेत (Nashik NMC) होणार्‍या बैठकीत महापालिका आयुक्तांसमोर लोकप्रतिनिधी आपले गार्‍हाणे मांडणार आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या (Shivsena) शिष्टमंडळाने दहीपूल परिसरात (Dahipul Area) सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या कामाची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर आज होणार्‍या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या ऑनलाईन बैठकीच्या सुरुवातीलाच संचालक महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) व शाहू खैरे (Shahu Khaire) यांनी शहरात सुरु असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली.

दहिपूल येथे तयार करण्यात येणारा रस्ता चुकीच्या पद्धतीने होत असून याबाबत मनपा आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी सूचना करून त्यावर अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

त्याचबरोबर नागरिक आणि व्यापार्‍यांचे होणारे हाल विचारात घेता सध्या स्मार्ट सिटीने कोणतेही नवीन काम सुरु करू नये अशी सूचना महापौरांनी केली. सध्या सुरु असलेले कामे पूर्ण करा आणि मगच नवीन कामांबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

काही कामांसाठी स्मार्ट सिटीला निधी (Fund) देण्याच्या विषयालाही महापौर व नगरसेवक खैरे यांनी विरोध केला. स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे कामे सुरु आहे.

बैठकीत सहव्यवस्थापकीय संचालक शिवराज पाटील, सभागृह नेते कमलेश बोडके, सुमंत मोरे व निवृत्त अधिकारी भास्कर मुंढे यांना संचालक करून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीसाठी मुख्य सचिव तथा अध्यक्ष सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा आयुक्त कैलास जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते कमलेश बोडके, नगरसेवक शाहू खैरे, गुरमीतसिंग बग्गा, तुषार पगार व कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.