नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकार्यांच्या वेतनावर मोठा खर्च होत असतांनाच यात संगणक प्रमुख व प्रशासन अधिकारी अशा दोन अधिकार्यांना नियुक्ती दिल्यानंतर यास संचालक पदाधिकार्यांनी आक्षेप घेतला. अधिकारी नियुक्तीचा अधिकार संचालक मंडळाचा असतांना परस्पर नियुक्ती करीत यासंदर्भातील माहितीस्तव सभेत ठेवल्यामुळे संचालकांनी विरोध केला. दरम्यान महापौरांनी थविल यांच्या बदलीसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील निर्णय शासन घेईल असे स्पष्टीकरण दिले.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची चौथी वार्षिक सर्वसाधारण बैठक व 18 वी संचालक मंडळाची बैठक पंचवटी विभागीय कार्यालयातील स्मार्ट सिटी कंपनी कार्यालयालगतच तयार करण्यात आलेल्या नुतन कार्यालयात अध्यक्ष कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले. तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वित्तीय विवरणपत्र मंजुर करण्यात आले व संचालकांची नियुक्ती नियमीत करण्यात आली. याचवेळी संचालक मंडळाच्या हस्ते नाशिक स्मार्ट सिटीने कर्मचार्यांसाठी बनविलेल्या मंथली प्लॅनर डायरी 2021 चेही अनावरण करण्यात आले.

तळागाळातील आणि गरजुंना कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी पुणे येथील लाईट हाऊस कम्युनिटिज् फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.3 ईएसआर, 1 जीएसआर व पंप हाऊसच्या निविदेला या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा (24.42 कोटींच्या निविदेला सर्वात कमी 21.66 कोटींची स्विकृत रक्कम) 11.29 टक्के कमी रकमेच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत शहरामध्ये 20 लाख लिटर क्षमतेच्या 2 ठिकाणी व 17.5 लाख लिटर क्षमतेचा एक ठिकाणी ईएसआर (इलेवेटेड स्टोरेज रिजर्वायर- जलकुंभ) व 20 लाख लिटर क्षमतेचा जीएसआर (ग्राऊंड स्टोरेज रिजर्वायर- जलकुंभ) आणि पंप हाऊस ही कामे होणार आहेत. पंचवटी डेपो, गोल्फ क्लब, सादीक शहा (जुने नाशिक) येथे ईएसआर तर, दीक्षित वाडा (जुने नाशिक) येथे जीएसआरचे काम होणार आहे.

स्मार्ट रोडचे काम करताना कंत्राटदाराने कामामध्ये दिरंगाई केल्याबाबत नुकसान भरपाईची रू. 1.70 कोटी रक्कम त्याच्या बीलातून कपात करण्यात आली आहे. कंत्राटदाराने सेटलमेंट ऑफ डिस्पुट या कलमाखाली लवादाकडे धाव घेत भरपाईची मागणी केली आहे. त्यासाठी नाशिक स्मार्ट सिटीला आर्बिट्रेशन ण्ड कौन्सिलिएशन क्ट 1996 अंतर्गत लवाद नेमणे आवश्यक असल्याचा मुद्दा या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता, त्याला मान्यता देण्यात आली आहे. या लवादात प्रतिनिधी नियुक्ती होणार असुन याकरिता लागणार्या 15 लाख रु. खर्चास मान्यता देण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी दिल्ली येथून रामचरण मीना व स्वतंत्र संचालक भास्करराव मुंडे ऑनलाईन पद्धतीने तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर श्रीमती भिकुबाई बागूल, सभागृह नेते सतिश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक गुरूमितसिंह बग्गा, स्वतंत्र संचालक तुषार पगार आदीसह बैठकीसाठी उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक स्मार्ट सिटीच्या विस्तारीत कार्यालयात फीत कापून अध्यक्ष सिताराम कुंटे यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी महापौर सतिश कुलकर्णी तसेच संचालक, भागधारक यांच्या उपस्थितीत या नुतन कार्यालयात प्रवेश करण्यात आला. या कार्यालयात सुसज्ज असा बोर्ड रूम तयार करण्यात आला आहे. कर्मचार्यांना बसण्यासाठी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहेत. या उद्घाटनाबाबत पदाधिकारी संचालक अनभिज्ञ असल्याचे याप्रसंगी समोर आले. या उद्घाटनाची माहिती आजच पदाधिकार्यांना देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शहरातील स्मार्ट पार्कींग संकटात

शहरात स्मार्ट सिटी कंपनीकडुन शहरात सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट पार्कींगच्या ठेकेदाराला परवडत नसल्याचे पत्र त्यांनी कंपनीला दिले आहे. करोना काळात ठेकेदाराचा खर्च जास्त व वसुली कमी झाली, यामुळे ठेकेदार कंपनीने टेंडर रक्कमेत काही माफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात चर्चा होऊन ठेकेदाराला दिलासा देण्यास पदाधिकार्यांनी विरोध केला. यामुळे यावर निर्णय झाला नाही. मात्र अध्यक्ष कुंटे यांनी ठेकेदाराला दिलासा कसा देता येईल ते बघु, असे सांगितले.