शिक्षणाधिकारी कार्यालयास ठोकले कुलूप

काही वेळाने आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे
शिक्षणाधिकारी कार्यालयास ठोकले कुलूप

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनेक अडचणी व तक्रारी संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही योग्य निर्णय होत नसल्याने जिह्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयास कुलूप ठोकले. मात्र काही वेळाने आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफ तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या वतीने तीन दिवसांपूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याबाबत इशारा दिलेला होता. ठरल्याप्रमाणे आज जिल्हाभरातील पदाधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले असता, शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हत्या. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क केला असता,त्या बाहेर गावी होत्या, म्हणून त्यांनी अधीक्षक सुधीर पगार व उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना चर्चेसाठी पाठविले.

संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी वेतन पथक कार्यालया बद्दल तक्रारींचा पाढा वाचला, गेल्या अनेक वर्षापासून पुरवणी बीले नाहीत, तसेच 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत सर्व प्रकारचे मेडिकल बिले काढले असे वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांनी सांगितले. लॉकडाऊन च्या काळातही काही संस्थाचालक व मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत येण्याबाबत सक्ती करतात तसेच कारणे दाखवा नोटिसा देतात, याबाबत संबंधित शाळांची नावे कळविल्यास त्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असे अधिकार्‍यांनी सांगितले.

निवेदन देऊनही शिक्षणाधिकारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित न राहिल्याने, त्यांचा निषेध म्हणून संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले व शिक्षणाधिकार्‍यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवण्यात आले, व त्यांच्या कार्यालयालाही कुलूप ठोकण्यात आले, पगार व शहारे यानी विनंती केल्याने पदाधिकार्‍यांनी कुलुप काढले व गुरुवार दिनांक 27 मे रोजी वेतन पथक अधीक्षक यांच्या समवेत सविस्तर बैठक घेऊन सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम, मालेगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष अनिल अहिरे, कार्यवाह जयेश सावंत, शिक्षक परिषदेचे दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, प्रदीप सिंग पाटील, त्र्यंबक मार्तंड, मनोहर देसाई, देशमुख अण्णा सचिन देशमुख, अशोक मार्तंड, सचिन शेवाळे, आशिष पवार, राजेंद्र शेळके डी आर पठाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com