सुरगाणा / पळसन । प्रतिनिधी Surgana / Palsan

सुरगाणा तालुक्यातील अधिकारी व सेवक यांनी मुख्यालयी रहावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे.

सुरगाणा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुका आढावा बैठकीत असा इशारा आमदार नितीन पवार यांनी दिला.

बैठकीत विविध विभागातील अधिकार्यांकडून समस्या जाणून घेत कामात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांना सुनावत सक्त सुचना केल्या.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्यांची कामकाजाची पद्धत , गरोदर मातांना नाशिकला पाठवणे बंद करावे, बार्हे येथील रुग्णालयात खाटा उपलब्ध करा. पी.पी.ई कीट उपलब्ध करावे, एकात्मिक बालविकास प्रकल्पात अंडे मिळत नाहीत अशा तक्रारी ग्रामस्थांनी के ल्या.

उपसभापती इंद्रजित गावित यांनी सांगितले की, शिक्षण विभागाच्या अधिकार्यांसह तालुक्यात 824 पैकी 506 शिक्षक नाशिक येथून ये - जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना करोनाची लागण होऊ शकते.

गावात करोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी तालुक्यातच राहून शाळेत जावे.जे रहात नाही त्यांच्यावर काय कारवाई करणार अशी विचारणा केली असता गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी नोकरदारांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता बंद केला जाणार असल्याचे सांगितले.

या बैठकीत वनजमिनी सातबारा, वनपट्टे प्रमाणपत्र, नुकसान भरपाई अनुदान वाटप बाबत अडचणी, स्वस्त धान्य वितरणातील अडचणी, खावटी अनुदान योजना, वीजवितरण सबंधित प्रश्न, शालेय व अंगणवाडी पोषण आहार योजना, मागील तीन वर्षांतील विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस प्रांताधिकारी विकास मीना, तहसीलदार विजय सुर्यवंशी, सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, डॉ. सुरेश पांडूले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, चिंतामण गावित, गोपाळराव धुम, नवसू गायकवाड आदी उपस्थित होते.