पोलिसांकडून कामगारांची अडवणूक; छत्रपती सेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.
USER

पोलिसांकडून कामगारांची अडवणूक; छत्रपती सेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

नवीन नाशिक । प्रतिनिधी

करोना काळातही उद्योग व्यवसाय सुरू राहिले पाहिजे. राज्यावर आर्थिक संकट येऊ नये म्हणून उद्योगाची चाके चालू राहिली पाहिजेत याबाबत स्वतः प्रशासन सकारात्मक असताना कामावर जाणाऱ्या कामगारांची पोलिसांकडून अडवणूक होत असल्याने याबाबत छत्रपती सेनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

नाशिक मध्ये अंबड व सातपूर या औद्योगिक वसाहती आहेत. त्यात तिकडे जाणारा पाथर्डी फाटा महत्त्वाचा रस्ता आहे. याच रस्त्यावर चौफुलीवर अंबड पोलिसांकडून कामगारांना अडवले जाते आहे. कामगार कामावर जात आहेत, त्यांच्या हातात जेवणाचा डब्बा असतो, गळ्यात आयकार्ड असते. तरीसुद्धा पोलीस थांबवून त्यांच्याकडून हजार रुपये दंड व बळजबरी करोना टेस्ट करून घेत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.

करोना काळात नागरिक हैराण झालेले असताना पोलिसांकडून मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई नक्की करावी मात्र जो कामगार कामावर जात आहे हे समजून सुद्धा पोलिसांकडून कारवाई केली जात असेल अडवणूक केली जात असेल तर याला काय म्हणायचे? याबाबत छत्रपती सेनेने अध्यक्ष चेतन शेलार, नीलेश शेलार, तुषार गवळी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे.

कंपनी कामगारांची कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये असे पत्रात म्हटले आहे. हे पत्र नाशिकचे मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व राज्याचे गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहे. यावर प्रशासन दखल घेऊन पोलिसांना योग्य त्या सूचना देतील अशी अपेक्षा छत्रपती सेनेने व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com