मनमाडमध्ये ‘करोना’बाधितांची संख्या १२५ वर

नागरिक भयभीत, पालिका कारभार मुख्याधिकार्‍यांविना
मनमाडमध्ये ‘करोना’बाधितांची संख्या १२५ वर
मनमाड

मनमाड ।

शहरात ‘करोना’चा कहर थांबायचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून दररोज नवे ‘करोना’बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 125 वर पोहोचली आहे. नियंत्रणात आलेल्या ‘करोना’ने शहरात पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा संकटसमयी नगरपालिकेचा कारभार मुख्याधिकार्‍यांशिवाय सुरू आहे.

शहरात ‘करोना’ संसर्ग वाढत आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज असताना पाच दिवसांपूर्वी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या जागी दुसरा अधिकारी अजूनही नेमला गेलेला नाही. पालिका प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे उपाययोजनांचा फज्जा उडाला आहे. मालेगावनंतर नाशिक जिल्ह्यात मनमाड हे सर्वात मोठे शहर आहे. ‘करोना’ संकटकाळात मुख्याधिकार्‍यांची बदली करून राज्य सरकारने शहरातील सव्वा लाख नागरिकांना वार्‍यावर सोडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहेत.

2 मे रोजी शहरात ‘करोना’चा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत जाऊन ती 54 वर पोहोचली होती. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, इतर सेवक आणि आरोग्य विभाग यांनी मिळून विविध उपाययोजना केल्या. आपापली जबाबदारी पार पाडताना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची त्यांना पुरेपूर साथ मिळाली. त्यामुळे करोना आटोक्यात आला होता. टप्प्याटप्प्याने रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने शहर ‘कोरोना’मुक्त झाले होते. मात्र आता शहरात ‘करोना’ रुग्ण पुन्हा आढळून आले असून ही संख्या 125 वर पोहोचली आहे.

त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. करोनाला आटोक्यात आणण्यासाठी वेगेवगळ्या उपाय योजना करण्याची नितांत गरज असताना अशावेळी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. पाच दिवस उलटल्यानंतरही नव्या मुख्याधिकार्‍यांची नेमणूक झालेली नाही. पालिकेत निर्णय घेणारा आणि प्रशासनावर अंकुश ठेवणारा जबाबदार अधिकारी नसल्याने पालिका प्रशासन एका प्रकारे निरंकुश झाले आहे. पालिकेत तातडीने नव्या मुख्याधिकार्‍यांची नेमणूक करावी किंवा मुख्याधिकार्‍यांचा कार्यभार अन्य अधिकार्‍याकडे सोपवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com