नाशिक | Nashik
महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गांसाठी आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. एमपीएससीने वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला असून, आता एका अर्जाद्वारे विद्यार्थ्यांना तीन संवर्गातील पदांसाठी पात्र होता येणार आहे. एमपीएससीने महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गांसाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे.

महसूल आणि वन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील भरतीसाठी एमपीएससीकडू महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जात होती.

या संवर्गांच्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र, तीनही परीक्षांच्या आयोजनाबाबत विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीसाठी आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ ही एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षायोजना, अभ्यासक्रम आदी तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल की मनस्ताप सहन करावा लागेल, हे येत्या काही दिवसांत कळेल.

अशी होणार नवी परीक्षा
संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते एक, दोन किंवा तीनही परीक्षांना बसू इच्छितात का, या बाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील.

त्या आधारे, भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील.

पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी एमपीएससीकडून प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जाईल.