'एमपीएससी'साठी आता केवळ ६ संधी

एमपीएससी
एमपीएससी

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा निश्‍चित केली आहे. उमेदवाराला सहा परीक्षा देण्यासाठी संधी मिळणार आहे.

तर, इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारास कमाल नऊ संधीची मर्यादा लागू करण्यात आली आहे. यापूर्वी, ही परीक्षा देण्यासाठी कमाल संधींची अट नव्हती. या निर्णयाची अंमलबजावणी २०२१ सालामध्ये प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींपासून होणार आहे.

निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतल्याचे 'एमपीएससी'ने सांगितले आहे. 'एमपीएससी'मार्फत विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवारांच्या नियुक्‍तीसाठी परीक्षा घेतल्या जातात.

त्यानंतर, पात्र उमेदवारांची राज्य सरकारच्या विभागांकडे नियुक्‍तीसाठी शिफारस केली जाते. सरकारी पदांसाठी आतापर्यंत उमेदवाराला दिलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी होती. त्यामुळे वयाचा निकष संपेपर्यंत उमेदवार आयोगाच्या परीक्षा देत. या परीक्षांमध्ये उमेदवारांना अपयश आले, तरी ते पाच वर्षांपर्यंत तयारी करीत राहत.

या परीक्षेच्या संधींसाठी काही मर्यादा निश्‍चित करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर 'एमपीएससी'ने अखेर ही मर्यादा घालून दिली.

या नव्या निर्णयानुसार, 'एमपीएससी'च्या शासकीय पदांसाठी खुल्या संवर्गातील उमेदवाराला परीक्षेच्या सहा संधी उपलब्ध होतील, तर इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील. त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधींची मर्यादा लागू राहणार नाही, असे 'एमपीएससी'ने परिपत्राकाद्वारे स्पष्ट केले आहे.

संधींची मोजणी

राज्यातील एखाद्या उमेदवाराने, एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाणार आहे.

उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरला किंवा त्याची उमेदवारी रद्द झाली, तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती गणली जाणार असल्याचे 'एमपीएससी'ने म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com