लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

लासलगाव बाजार समितीतून खरेदी केलेली मका देखील निर्यात होऊ लागली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून पहिल्यांदाच मका निर्यातीसाठी मुंबईकडे रवाना झाली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत मकाला मागणी असल्याने व लासलगाव बाजार समितीत 1400 ते 1500 रु. सरासरी भावाने मका विक्री होत असून कांद्याचे माहेरघर समजल्या जाणार्या लासलगावमधून आता मका ही निर्यात होऊ लागली आहे. रेल्वेद्वारे विविध बंदरापर्यंत कांदा पाठविला जातो. तसेच आता मका देखील निर्यात होऊ लागली आहे. शनिवारी पहिल्यांदाच रेल्वेद्वारे सुमारे 1300 टन मका 21 रेल्वे वॅगन्स मधून शिवशक्ती ट्रेडर्स यांचेमार्फत मुंबईकडे पाठविण्यात आला.

लासलगाव बाजार समितीचे व्यापारी सचिनकुमार ब्रम्हेचा यांनी खरेदी केलेला मका निर्यातीसाठी पहिल्यांदाच रेल्वे मार्गाने पाठविला जात असल्याने यातून रेल्वेला सुमारे 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती रेल्वे मालवाहतुकीचे लासलगाव येथील दलाल निलेशकुमार उपाध्ये यांनी यावेळी दिली.

शनिवारी दिवसभर लासलगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे वॅगन्स मध्ये 40 ते 50 मजूरांनी हा मका भरण्याचे काम हाती घेतलेले होते. सुमारे 55 ते 60 मालट्रकमधून सुमारे 1300 टन मका रेल्वेस्थानक परिसरात आणला गेला. 42 रुपये क्विंटल प्रमाणे रेल्वेला सुमारे 5 ते साडेपाच लाख रुपयांचा महसूल यानिमित्ताने मिळाला आहे. मुंबई येथे शनिवारी रात्री हा मका पोहोचल्यानंतर तो मुंबई बंदरा मार्गे इतर देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे येथून मका निर्यात होत आहे.