नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून घेण्यात येणारी ‘कल चाचणी’ यंदापासून रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी दहावीच्या विद्यार्थ्यांची आवड, त्यांच्यातील गुण आणि करिअर म्हणून एखादे क्षेत्र निवडण्यासाठी मदत करणारी योग्यता चाचणी घेण्यात येणार आहे. यापूर्वी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेपूर्वी कल चाचणी घेतली जात होती. परंतु आता लेखी परीक्षा झाल्यानंतर योग्यता चाचणी घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा ठरविता यावी, म्हणून शालेय शिक्षण विभागाने २०१६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू केला. राज्यभरातून इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कलचाचणी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी घेतली जात होती. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित समुपदेशकांचे पथक नेमले आहे.

कलचाचणी ‘श्यामची आई फाउंडेशन’मार्फत घेण्यात येत होती. परंतु ही चाचणी घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि फाउंडेशन यांच्यात झालेला करार संपला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने कलचाचणी परीक्षा यंदापासून रद्द केली आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व, आवड लक्षात यावी, याकरिता शास्त्रशुद्ध अशी याेग्यता चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी समुपदेशक आणि प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून बोर्डाची लेखी परीक्षा झाल्यानंतर ऑफलाइन होणार असल़्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.