शेतकरी बांधवानो ! आता पीक कर्जाचा अर्ज घरबसल्या करा

जिल्ह्यात ९३० कोटींचे पीक कर्ज वाटप
पीक कर्ज
पीक कर्ज

नाशिक । Nashik

पीक कर्जाचा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना बँक, सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्जाची सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली असून या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ तर वाचणार आहेच, शिवाय त्यांना शेतातील कामे सोडून बाहेर पडण्याचीही गरज भासणार नाही. तसेच आता पर्यंत जिल्ह्यात ९५० कोटी पीक कर्जाचे वाटप झाल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.११) पीककर्ज बैठक झाली. त्यावेळी नडे बोलत होते. यावेळी भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, लीड बँकेचे व्यवस्थापक अर्धंदू शेखर व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नडे म्हणाले, पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पीक कर्जाचे अर्ज सादर करण्यासाठी आता संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी थेट मोबाइलद्वारेदेखील या लिंकवर जावून कर्जासाठी अर्ज सादर करून शकतात. तसेच ही सुविधा सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका तसेच सर्व खासगी व व्यापारी बॅंकांसाठी उपलब्ध आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी छापील अर्जाद्वारे बँकांकडे पीक कर्ज कर्ज घेतलेले असेल किंवा ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहे व त्यावर कर्ज सुविधा उपलब्ध असेल त्या शेतकऱ्यांनी पुन्हा या सुविधेतून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नसून, ही सुविधा नव्याने अर्ज सादर करण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ९३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले असून, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना नव्याने खरीप पीक कर्ज वाटपाची गती वाढवून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व बँकानी प्रयत्न करावेत. पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधेचा लाभ तत्काळ मिळवून द्यावा, पीक कर्ज योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहचवून दिलेल्या उद्दीष्टाची पूर्तता करावी अशी सूचना उपस्थित सर्व बँकाच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत.

या बैठकित वर्ष २०२०-२१ च्या कृषि पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांचे हस्ते करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com