सहा खासगी रुग्णालयांना नोटिसा
नाशिक

सहा खासगी रुग्णालयांना नोटिसा

करोना रुग्णांकडून अवाजवी बिल वसुली

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कोविड व नॉन कोविड रुग्णांना बिल आकारणीचे दर ठरवून दिलेले असताना रुग्णांची आर्थिक लूट सुरू असल्याचे समोर आल्यानंतरदेखील काही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्राप्त तक्रारीनंतर शहरातील एकूण ६ खासगी रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

नाशिक शहरातील करोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व स्थायी समिती माजी समिती सलीम शेख यांनी उघडकीस आणला होता. रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणी केली जात असल्यासंदर्भात अगोदर आलेल्या दोन तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करुन तक्रारीची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

यानुसार 2 मोठ्या रुग्णालयांना नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यानंतर भाभानगरमधील एक रुग्णालयाला अशाच तक्रारीवरुन महापालिकेने नोटीस बजावली आहे. यानंतर देखील शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून जादा बिल आकारणी सुरूच असल्याचे समोर आले आहे. जादा बिलांच्या तक्रारीवरुन शहरातील आणखी तीन अशा आत्तापर्यंत सहा रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यानुसार आता तक्रारीची शहानिशा करण्यासाठी या रुग्णालयांकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. हा खुलासा लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार कारवाई कली जाणार आहे. यासंदर्भातील चौकशी आता सुरू झाली आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून बाधितांचे नातेवाईक खासगी रुग्णालयाकडे धाव घेत आहे. अगदी स्वॅब तपासणीपासून तर उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेेक्षा जास्त बिलांची आकारणी केली जात आहे. यासंदर्भात तक्रारी महापालिकेकडे येऊ लागल्या आहे. शहरातील खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा आरक्षित करण्यात आल्या आहे.

तसेच महात्मा फुले जीवनदायी योजनांत अंतर्भूत असलेले २२ खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू झाले आहे. यात कोविड रुग्णावरील उपचारासाठी शासनाने दर ठरवून दिलेले आहे. असे असताना काही खासगी रुग्णांकडून बाधित रुग्णांकडून दिवसासाठी हजारो रुपयांचे बिल आकारुन लाखो रुपयांची वसुली केली. तसेच नॉन कोविड रुग्णांकडूनदेखील अशाच प्रकारे बिलाच्या माध्यमातून लाखोंची वसुली केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अशाच प्रकरणासंदर्भात काही तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर दोन रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

जादा बिल आकारणी केल्यास तक्रार करा

खासगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारणीला आता आळा बसविण्यासाठी आता महापालिकेकडून विविध पातळीवर यंत्रणा कार्यरत केली आहे. असे असताना कोणी जादा बिल आकारणी करीत असेल तर महापालिकेकडे तक्रार करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच या तक्रारीसाठी शिवसेनेने हेल्पलाईन सुरू केली असून तक्रारकर्त्यांनी व ९३७२४२२८०० या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com