आयटीआयमध्ये घोटाळा नव्हे; अनियमितता

माहिती घेण्याचे काम सुरू, संचालक मंडळाचा दावा
आयटीआयमध्ये घोटाळा नव्हे; अनियमितता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या आयटीआयमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सभासदांनी केल्यानंतर यामध्ये घोटाळा नव्हे तर अनियमितता झाली आहे, असा दावा संचालक मंडळाने करत याबाबत सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कालअध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

सभासद मनोज बुरकुले यांनी आयटीआयमध्ये एक लाख 92 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावर अध्यक्ष थोरे व सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सांगितले की, यामध्ये कुठलाही घोटाळा झालेला नसून अनियमितता झालेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडून येणारी शैक्षणिक फी जमा झालेली नाही तर जी जमा झाली आहे, त्याच्या पावत्या सापडत नाही. याबाबतचा दस्तावेजही उपलब्ध नाही. आयटीआयकडे येणार्‍या एकूण पाच कोटींपैकी तीन कोटी सोळा लाख रुपये जमा झाले असून एक कोटी 91 लाख रुपयांचा हिशोब लागणे बाकी आहे. याची संपूर्ण माहिती जमा करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत संबंधित कर्मचार्‍याकडे चौकशी करण्यास गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळाल्याचेही सांगितले.

प्रारंभी सरचिटणीस धात्रक यांनी प्रास्ताविकात सर्वच विभागांचे प्रवेश हे शंभर टक्के झाले आहेत. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना शंभर टक्के वेतन दिले जात आहे. नायगाव, निर्‍हाळे, तळवाडे येथील शाळांचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे स्पष्ट केले. संस्थेकडे 20 कोटी बत्तीस लाख रुपये शिल्लक असून दोन कोटी 77 लाखांच्या ठेवी आहेत, असे सांगितले.

प्रभाकर धात्रक व मनोज बुरकुले यांनी बिगर मान्यतेच्या शाळा किती वर्षे चालवायच्या त्यांना मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्या. गोकुळ काकड यांनी या शाळा ग्रामीण भागात कराव्या, अशी सूचना केली. संस्थेच्या अनेक शाळांचे बांधकाम हे बिनशेती केल्याशिवाय झाले असून यापुढे असे होऊ नये, अशी सूचना केली.

दिघोळे, आव्हाड यांचे नाव द्या

माजी मंत्री तुकाराम दिघोळे, एन. एम. आव्हाड यांनी संस्थेसाठी आपले योगदान दिले असल्यामुळे त्यांची नावे एखादी शाळा, महाविद्यालयाला द्यावे, अशी मागणी बंडूनाना भाबड, मनोज बुरकुले, अर्जुन बोडके, बाळासाहेब वाघ आदींनी केली. या मुद्यावरून सभासद व पदाधिकारी यांच्यात गरमागरम चर्चा झाली. सर्वांना विश्वासात घेऊन ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांची नावे दिली जातील, असे आश्वासन सरचिटणीस धात्रक यांनी दिले. संस्थेचे अनेक शिक्षक हे अल्प वेतनावर काम करत असून त्यांची पगारवाढ करावी, अशी सूचना जे. डी. केदार यांनी केली. यावर अध्यक्ष थोरे यांनी विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांचे वेतन 25 ते 30 टक्क्यांनी वाढविले असल्याचे स्पष्ट केले. इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्या, अशी मागणी प्रभाकर धात्रक, बुरकुले यांनी केली. ग्रामीण भागात या शाळा सुरू कराव्या, अशी सूचना गोकुळ काकड यांनी केली. मयत सभासदांच्या वारसाचाही विषय निघाला, त्यावर अध्यक्ष थोरे यांनी अडीच ते तीन हजार सभासद मयत असून त्यापैकी केवळ 300 अर्ज मयत वारस सभासदांसाठी आल्याचे स्पष्ट केले. शाळेसाठी समाजाच्या गावामधून वर्गणी जमा करावी, अशी सूचना प्रभाकर धात्रक यांनी केली. संबंधित गावांना 15 ते 20 लाख रुपये जमा करण्यास सांगितल्याचे थोरे यांनी सांगितले.

कृती आराखडा तयार करावा

नवीन शैक्षणिक धोरण सन 2020 मध्ये आले असून ते पुढील वर्षापासून अंमलात येणार आहे. त्या दृष्टीने काही तज्ञ सभासद व शिक्षकांसाठी एक कार्यशाळा घ्यावी. पुढील आठ वर्षांचा कृती आराखडा तयार करावा. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, तुकाराम दिघोळे, एन. एम. आव्हाड यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार द्यावेत, अशा सूचना शिवाजीराव मानकर यांनी केली.

धात्रक यांचा सभात्याग

संस्थेचा सन 2021-22 चा वार्षिक अहवालास संपूर्ण हिशोब सभासदांना दिल्याशिवाय मंजूर करण्यास बुरकुले, प्रभाकर धात्रक, राजेंद्र सोनवणे यांनी विरोध दर्शवला. मात्र, यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सांगळे यांनी असे केले तर संचालक मंडळाला पुढील काम करणे अशक्य होईल, अशी सूचना केली. यानंतर सभागृहाने अहवाल मंजुरीच्या ठरावास अनुमोदन दिले. दरम्यान, प्रभाकर धात्रक यांनी यास आपला विरोध दर्शवत सभात्याग केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com