
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
जेलरोडच्या नारायणबापू चौकात Narayan Bapu Chowk नारायणबापू सोसायटीलगत सुरु असलेल्या खासगी बांधकाम व्यावसायिकाने एप्रिलमध्ये खोदून ठेवलेल्या खड्ड्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इमारतीच्या पायासाठी खोदलेल्या या खड्ड्यात पाणी साचल्याने water dump in pit त्यात डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांना त्याचा जाच होत आहे. सध्या साथीच्या आजाराचा होणार फैलाव लक्षात घेता हा खड्डा म्हणजे डेंग्यूचा अड्डा झाल्याचे चित्र आहे.
वर्दळीच्या ठिकाणचा हा भला मोठा खड्डा येथील रहिवासीयांच्या आरोग्याला धोकादायक बनला असताना याकडे मनपा प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने आता कोणाकडे दाद मागावी, असा संतप्त सवाल येथील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत नागरिकांनी मनपाकडे ऑनलाईन तक्रारही केली होती. त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने मोटर लावून पाणी उपसले. मात्र ही तात्पुरती मलमपट्टी कुचकामी ठरली.
खड्ड्याभोवती बांधलेले संरक्षक कुंपण तकलादू असून ते जागोजागी तुटल्याचे दिसते. या खड्ड्यात पाणी लागले असून सध्या पावसामुळे पाणी साचून त्यात शेवाळ व कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात डासांची निर्मिती होत असून त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तब्बल सहा महिन्यांपासून नुसताच खोदून ठेवलेला हा खड्डा एव्हाना डास निर्मितीचे केंद्र बनला असल्याने येथील रहिवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खड्ड्याभोवती गाजरगवत वाढले आहे. लहान मुले आजूबाजूला खेळत असतात. तुटक्या संरक्षक भिंती झाल्याने अप्रिय घटना होण्याची शक्यता आहे. वर्दळीच्या ठिकाणचा हा महाकाय व धोकादायक खड्डा लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या नजरेत पडत नाही का, असा संतप्त सवाल येथील रहिवासीयांनी उपस्थित केला आहे.