खरे गांधीजी कोणालाच कळले नाहीत

खरे गांधीजी कोणालाच कळले नाहीत

मामको बँक वर्धापनदिन व्याख्यानात विचारवंत मुनोत यांचे प्रतिपादन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सर्वसामान्य जनतेस त्यांचा अधिकार मिळावा यासाठीच महात्मा गांधीजींनी (Mahatma Gandhi) सर्वाधिक सत्याग्रह (Satyagraha) व उपोषण केल्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता (Father of the Nation) संबोधले जात आहे. गांधीजी हे कुठल्याही एका जातीधर्माचे नव्हते ते सर्वसामान्यांचे होते.

सर्व जातीतील नागरीकांना समाजात सारखेच स्थान मिळालयला हवे यासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही केले ते या जगासमोर मांडतांना त्याचा विपर्यास करण्यातच धन्यता मानली जात असल्याने खरा गांधी कोणालाच कळला नाही, अशी खंत पुणे येथील गांधी विचाराचे अभ्यासक-व्याख्याते संकेत मुनोत यांनी येथे बोलतांना केले.

तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या मामको बँकेचा (Mamko Bank) वर्धापनदिन (Anniversary) गांधी-शास्त्री जयंतीदिनी साजरा केला गेला. बँकेने हिरक महोत्सवी वर्षात प्रदार्पण केल्याबद्दल महात्मा गांधी जागतिक प्रभाव व समज-गैरसमज या विषयावर पुणे येथील गांधी विचाराचे अभ्यासक संकेत मुनोत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आयएमए हॉलमध्ये आयोजित व्याख्यानात मुनोत यांनी गांधीजींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला.

चेअरमन भरत पोफळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले, व्हा. चेअरमन अ‍ॅड. संजय दुसाने व्यासपिठावर उपस्थित होते. महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यात जे काही केले त्याचा जगासमोर मांडतांना विपर्यास केला गेल्याची खंत व्यक्त करत मुनोत पुढे म्हणाले, भारताची फाळणी झाली तेव्हा हिंदू-मुस्लीमांच्या दंगली झाल्या.

या दंगली थांबाव्यात यासाठीच गांधीजी उपोषणाला बसले होते. मात्र या उपोषणाचा विपर्यास पाकिस्तानला 55 कोटीची रक्कम मिळावी म्हणून ते उपोषणास बसले असल्याचा केला गेला. दलितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल ते मनस्वी दु:खी होते. त्यांनी सत्याग्रह, उपोषण केले ते स्वार्थासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेस त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी केले.

काही राजकारण्यांची फक्त ठराविक जातीतील लोकांनीच राजकारणात राहावे अशी मनस्वी इच्छा राहत परंतू गांधीजींचा त्यांना विरोध होता. त्यांच्या मते सर्व जातीतील नागरीकांना समाजात सारखे स्थान मिळाले पाहिजे. काही लोक त्यांना नास्तिक म्हणत परंतू गांधीजी सर्व देवांचे नाव घ्यायचे. ते सर्व देवांना मानायचे परंतू त्यांनी कधीही कोणत्याही देवाचे मंदिर बांधले नाही.

गांधीजी सर्वसामान्य माणसात देव पाहत असत. सर्वसामान्य जनतेत आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांचे दु:ख दूर करणे, त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणे अशा प्रकारे त्यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा केल्यामुळेच ते त्यांचे नेते होते. सर्वसामान्यांच्या हितासाठी गांधीजींनी केलेला संघर्षच त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाची साक्ष देणारा ठरला असल्याचे सांगत मुनोत यांनी गांधीजींच्या विविध कार्यावर व्याख्यानात सविस्तर माहिती दिली.

ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन करतांना अभ्यासक संकेत मुनोत यांच्यासारख्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये गांधीजी व त्यांच्या विचाराबद्दल जोपर्यंत आदर आहे तोपर्यंत गांधी सदैव या जगात जिवंत राहतील याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसल्याचे स्पष्ट केले. म. गांधींचा जागतिक प्रभाव तसेच समज-गैरसमज संदर्भात नागरीकांना माहिती व्हावी या दृष्टीकोनातूनच वर्धापनदिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे भोसले यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

प्रास्ताविक चेअरमन भरत पोफळे यांनी केले. कार्यक्रमास सतिष कासलीवाल, दादाजी वाघ, शरद दुसाने, नरेंद्र सोनवणे, भिका कोतकर, गौतम शाह, विठ्ठल बागुल, मंगला भावसार, छगन बागुल, उपेंद्र मेहता, भास्कर पाटील, विजय पोफळे आदींसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. जनरल मॅनेजर कैलास जगताप, विरेंद्र होनराव, राधेशाम जाजू, मिलींद गवांदे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन भिला अहिरे, मिलींद गवांदे यांनी तर शेवटी आभार व्हा. चेअरमन संजय दुसाने यांनी मानले. व्याख्यानानंतर संचालकांसह श्रोत्यांनी गांधीजी संदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे मुनोत यांनी दिली.

Related Stories

No stories found.