पंचवटी | Panchavti

वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाशिक कृषी बाजार समितीमध्ये ठिकठिकाणांवरून भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी आणि शेतकरी यांच्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या तक्रारी प्रशासनाकडे जात असल्याने गर्दीचे योग्य नियंत्रण नसेल तर बाजार समिती करोना संपेपर्यंत बंद करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बाजार समितीला दिला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर सभापती देवीदास पिंगळे यांनीही तातडीने बाजार समिती प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देत कठोर पावले उचलली आहे.

यापुढे बाजार समितीत 'नो मास्क नो एण्ट्री' हा नियम कडक करण्यात आला आहे.

नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

या ठिकाणी जिल्हाभरातून फळभाज्या, पालेभाज्या, कांदा-बटाटा असा माल घेऊन दररोज हजारो शेतकरी येत असतात. तसेच, काही मुंबईचे व्यापारीही बाजार समितीत येत असतात.

शेतकरी, हमाल-मापारी आदी वर्गाचीही मोठी गर्दी होत असते. यावेळी सामाजिक अंतर आणि बऱ्याच जणांनी मास्क लावलेले नसते, तसेच नाशिक शहरात जागोजागी भरणाऱ्या भाजी बाजारातील भरेकरीदेखील बाजार समितीतून पालेभाज्या व फळभाज्या घेऊन जात असतात. गेल्यावर्षी नाशिकमधील तिसरा रुग्ण बाजार समितीमध्येच आढळला होता.

त्यामुळे आजची कोरोना रुग्णसंख्या बघता प्रशासन कठोर पावले उचलत आहे. योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक बाब असून, याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु, वारंवार सूचना देऊनही बाजार समितीत होणाऱ्या गर्दीविषयी प्रशासन गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी जात असतात.

म्हणून जिल्हाधिकारी मांढरे यांनी सभापती पिंगळे यांना फोन करून गर्दी नियंत्रणासाठी योग्य कारवाई न केल्यास करोनाचा समूळ नायनाट होईपर्यंत बाजार समिती बंद करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या आहेत. बाजार समितीत 'नो मास्क नो एंट्री' हा नियम कडक केला आहे. प्रत्येक घटकाने सामाजिक अंतर राखून आर्थिक व्यवहार करावे.

शासनाच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी व सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या घटकांवर पोलिस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्यात येईल. राज्य शासनाची 'मी जबाबदार' ही मोहीम प्रखरपणे राबविली जाणार आहे. बाजार समिती आवारात ध्वनीक्षेपकाद्वारे येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, मापारी, हमाल यांना वेळोवेळी सामाजिक अंतर ठेवा, मास्क वापरा, अश्या सूचना दिल्या जात आहेत. प्रत्येकाने नियमांचे पालन करून बाजार समितीस सहकार्य करावे.

- देविदास पिंगळे

सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,नाशिक.