निधीबाबत आरोग्य सभापतीच अनभिज्ञ

निधीबाबत आरोग्य सभापतीच अनभिज्ञ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यासाठी आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा (एनआरएचएम) निधीबाबत दस्तुरखुद्द आरोग्य सभापतीच अनभिज्ञ असल्याचा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला.

यामुळे सदस्यांनी आरोग्य विभागाला चागलेच धारेवर धरले.यात वेळीच अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी हस्तक्षेप केला. लवकरच यासंदर्भात संबंधीत समितीची बैठक घेऊन निधी व कामांचा आढावा घेतला जाईल व सर्व सदस्यांना याबाबत माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमधून जिल्ह्याला आलेल्या निधीबाबत माहिती विचारली.त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर यांनी यावर्षी १२ कोटी रुपये आल्याचे व मागील वर्षीचे दायीत्व ४४.९१ कोटी रुपये असल्याचे सांगितले.

डॉ. कुंभार्डे यांनी सभापतींना याबाबत माहिती आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनी आपण अनेकदा माहिती विचारूनही ती देण्यात न आल्याची तक्रार केली. यावेळी डॉ. कपील आहेर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी त्यात हस्तक्षेप करीत याबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आलेल्या निधीची माहिती घेतली जाईल. त्यानंतर सर्व सदस्यांना त्यांच्या गटात सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com