नो हेल्मेट नो पेट्रोलनंतर आता नाशकात 'नो हेल्मेट नो कोऑपरेशन'

हेल्मेट शोभेसाठीच आहे का?
हेल्मेट शोभेसाठीच आहे का?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नो हेल्मेट नो पेट्रोल (No Helmet No Petrol) या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी दिवाळीपासून (Diwali) नो हेल्मेट नो कोऑपरेशन (No Helmet No Cooperation) मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे...

यासंदर्भात आदेशदेखील पारित केला आहे. दिवाळीमध्ये भाऊबीजपासून (Bhaubij) म्हणजेच दि. ६ नोव्हेंबरपासून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणे, औद्योगिक वसाहत परिसर, शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, कॅन्टाेन्मेंट परिसर व इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात आता विनाहेल्मेट प्रवेश मिळणार नाही.

शहरात स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) मुहूर्तावर 'नो हेल्मेट नो पेट्रोल' ही मोहीम सुरु झाली होती. या मोहिमेंतर्गत हेल्मेट नसलेल्यांना पेट्रोल (Petrol) देण्यात येत नव्हते. या

आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पंपावर पोलिसांचादेखील बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नियमित चौकशी केली जात आहे. तसेच या नियमनाचे काटेकोरपणे पालन केले गेल्याने शहरात हेल्मेट धारकांची संख्यादेखील वाढल्याचे दिसून येत आहे.

उर्वरित जे कोणी हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करत असल्याच्या पार्शवभूमीवर आता शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणे येथे विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही.

या ठिकाणीदेखील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे संबंधित कार्यालयांना अनिवार्य राहणार आहे. या कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीचालक आढळून आल्यास संबंधित चालकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात ८ दिवस तुरुंगवास आणि १ हजार २०० रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

नो हेल्मेट नो पेट्रोल मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोल दिले जात नसल्याने हेल्मेट वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रस्ते अपघातात मृत्यू टाळण्यासाठी हे चित्र दिलासादायक असले तरी नागरिकांनी हेल्मेट वापरावे यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय आणि इतर ठिकाणीदेखील हेल्मेटसक्ती गरजेची करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपासून हे आदेश लागू होतील.

- दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक शहर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com