मालेगाव । प्रतिनिधी

मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या विरुद्ध दाखल अविश्वास ठराव आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन दिल्याने एकमताने मंजूर झाला. 80 विरुद्ध शून्य असे मतदान नोंदवले गेले. मनपाच्या 21 वर्षांच्या इतिहासात प्रथमच विशेष महासभेत आयुक्तांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्याची घटना घडली आहे.

आयुक्तांच्या मनमानी कामकाजाविरुद्ध नगरसेवकांनी अविश्वास व्यक्त केला असल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात येवून मनपात नवीन आयुक्तांची नियुक्ती शासनाने करावी, अशी मागणी केली जाणार आहे. आयुक्तांचे कामकाज शहरहिताविरुद्ध असल्यामुळेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत हा ठराव मंजूर केला असल्याचे स्पष्टीकरण महापौर ताहेरा शेख यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना केले.

बायोमायनिंग, वाहन खरेदी, पंपिंग स्टेशन दुरूस्ती, वॉटर ग्रेस ठेकेदारास दंडाची रक्कम परत करणे, करोना साहित्य खरेदी व उपाययोजना आदी विविध बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडले आहे. कोट्यवधी रूपयांचे हे गैरप्रकार मनपाचे आर्थिक कंबरडे मोडणारे असल्याचा होत असलेला आरोप तसेच आयुक्तांतर्फे मनमानी कारभार केला जात असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्याने सत्तारूढ काँग्रेसचे नेते माजी आ. शेख रशीद यांनी अविश्वास ठरावाचा बिगुल फुंकला होता.

या प्रस्तावास भाजप गटनेते सुनिल गायकवाड, जनता दल नेते मुस्तकीम डिग्नेटी, महाआघाडी गटनेत्या शानेहिंद निहाल अहमद आदींनी समर्थन दिले होते. आयुक्तांचे सर्व वादग्रस्त ठराव रद्द केले जात असतील तरच प्रस्तावास पाठींबा देण्याचे संकेत एमआयएम गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी दिले होते. त्यामुळे अविश्वास ठराव बहुमताने मंजूर होण्याचे चित्र स्पष्ट झाले होते.

काल दुपारी 4 वाजता मनपा सभागृहात ऑनलाईनव्दारे महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेस प्रारंभ झाला. उपमहापौर नीलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, नगरसचिव शाम बुरकूल आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

महासभेस प्रारंभ होताच जनता दल नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी यांनी आयुक्तांच्या कारभाराविरुद्ध तोफ डागली. शहर हितासाठी हा ठराव आणला आहे. नगरसेवक जनमताचा आदर ठेवत ठरावाच्या बाजुने मतदान करतील. जे आयुक्तांबरोबर आहेत ते ठरावावर मतदान करणार नाहीत, अशी सुचना डिग्नेटी यांनी मांडली.

तर एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी आयुक्तांचे सर्व वादग्रस्त ठराव रद्द झाले पाहिजेत. एकीकडे आयुक्तांविरूध्द प्रधान सचिवांकडे तक्रार करायची व नंतर पुन्हा तक्रार नसल्याचे पत्र महापौरांतर्फे सादर केले जाते हा गौडबंगाल काय? याचे स्पष्टीकरण महापौरांनी द्यावे, अशी हरकत घेत महापौरांकडे स्पष्टीकरण मागितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत महापौर ताहेरा शेख यांनी अविश्वास ठराव सुचना मांडण्याचे निर्देश दिले.

नगरसचिव शाम बुरकूल यांनी ठरावाच्या बाजुने व विरोधात मतदान प्रक्रियेची माहिती दिल्यानंतर मतदानास प्रारंभ झाला. अविश्वास ठरावाच्या बाजुने काँग्रेसचे 28, महागठबंधन आघाडीचे 26, शिवसेना 12, भाजप 9, एमआयएम 5 अशा 80 सदस्यांनी मतदान नोंदवले.

महापौर ताहेरा शेख यांनी 80 विरुद्ध शून्य मतांनी आयुक्तांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. उपमहापौर निलेश आहेर यांनी अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान करणार्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार मानले. एमआयएम नेते नगरसेवक हाजी मो. युनूस ईसा, सादिया लईक तसेच शिवसेनेचे नारायण शिंदे हे तिघे नगरसेवक आजारी असल्याने महासभेत उपस्थित नव्हते.