मालेगाव मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव

आज विशेष महासभा
मालेगाव मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव
USER

मालेगाव । प्रतिनिधी

मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी आज गुरुवारी दुपारी 4 वाजता महापौर ताहेरा शेख यांनी विशेष महासभा बोलवली आहे.मनपा सभागृहात ऑनलाईनद्वारे होणार्‍या विशेष सभेत आयुक्तांविरुद्धचा अविश्वास ठराव 65 पेक्षा अधिक मतांनी संमत होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शेख रशीद यांनी केला आहे.

बायोमायनिंग, वाहन खरेदी, पंपिंग स्टेशन, वॉटरग्रेस ठेकेदारास दंडाची रक्कम परत करणे, करोना साहित्य उपाययोजना आदी विविध बाबींवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडले आहेत. कोट्यवधी रुपयांचे हे गैरप्रकार असून अधिक चौकशी झाल्यास मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस येणार आहे. मनपाच्या आर्थिक हिताविरुद्ध कारभार करणारे आयुक्त प्रशासकीय कामकाजदेखील मनमानी पद्धतीने करत असल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे हा अविश्वास ठराव आणण्यात येत आहे. मनपाच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाला असून तो मंजूरदेखील होईल, असे शेख रशीद यांनी सांगितले.

मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या कारभाराने त्रस्त झालेल्या सत्तारूढ काँग्रेसचे 28, शिवसेना 13 तसेच भाजप 9 व राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 अशा 54 नगरसेवकांनी स्वाक्षरी करत आयुक्तांविरुद्ध प्रशासकीय कामकाजाबाबत नाराज असल्याचे कारण देत अविश्वास ठराव आणल्याने महापौर ताहेरा शेख यांनी त्यांना प्राप्त विशेषाधिकारानुसार सदरची विशेष महासभा बोलवली आहे.

सदरचा अविश्वास ठराव दोन महिन्यांपूर्वीच दाखल होणार होता. मात्र कृषिमंत्री दादा भुसे यांनी सबुरीचा सल्ला दिल्याने हा प्रस्ताव रेंगाळला होता. कृषिमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने प्रशासकीय कामकाजात सुधारणा होईल, अशी नगरसेवकांची अपेक्षा होती. मात्र त्यात कुठलाही फरक पडला नाही. आयुक्तांबद्दल बेकायदेशीर कामकाजाबाबत मोठ्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या जात आहेत. शहराची स्वच्छता योग्यरीत्या न करणार्‍या वॉटरग्रेस या ठेकेदारास उपायुक्तांतर्फे दंड ठोठावण्यात आला होता. मात्र या दंडाची रक्कम आयुक्तांनी परत केल्याने मनपाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवकांतर्फे केला जात आहे. या सर्व कारणांवरून हा अविश्वास ठराव मांडण्यात आला असून या सभेचे अजेंडे नगरसचिव शाम बुरकुल यांनी सर्व सदस्यांना पाठवले आहेत.

जनता दलाचे नेते नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी यांनीदेखील अविश्वास ठरावाला जनता दलाचे नगरसेवक समर्थन देणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. नगरसेवकांना वेगवेगळी आमिषे दाखवली जात असली तरी आमचे नगरसेवक ठरावाच्या बाजूने मतदान करतील, असे डिग्नेटी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com