गिरणा-माणिकपूंज आरक्षणात बदल नको

शहर पाणीपुरवठा आढावा बैठकीत आ. सुहास कादेंचे निर्देश
गिरणा-माणिकपूंज आरक्षणात बदल नको

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

गिरणा धरणातून नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या योजनेस तांत्रिक मंजुरी देतांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरासाठी असलेले गिरणा व माणिकपूंज धरणातील पाण्याचे आरक्षण जैसे थे ठेवावे त्यात कुठलाही बदल अथवा कपात करू नये, असे स्पष्ट निर्देश आ. सुहास कांदे यांनी येथे बोलतांना दिले.

गिरणा धरणातून नांदगाव शहरास पिण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव नगर पालिकेतर्फे तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या योजने संदर्भात नगर पालिका सभागृहात आ. सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात येवून योजनेसह पाणी आरक्षणासंदर्भात चर्चा केली गेली.

यावेळी गिरणा व माणिकपूंजमधील नांदगाव शहरासाठी असलेल्या पाणी आरक्षणात या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेमुळे कुठलाही बदल केला जावू नये, अशी स्पष्ट सुचना आ. कांदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना केली. नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्यासह मुख्याधिकारी पंकज गोसावी, जीवन प्राधिकरणाचे अभियंता परदेशी, योजना शाखाधिकारी एस.आर. पाटील, कार्यकारी अभियंता राहुल पाटील आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गिरणा व माणिकपूंज धरणातून नांदगाव शहरास पाणीपुरवठा केला जात आहे. 1.42 द.ल.घ.फुट माणिकपूंजमध्ये तर 1.26 द.ल.घ.फुट पाणी गिरणा धरणात शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. आजमितीस सात दिवसाआड पाणीपुरवठा शहरास होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे हे संकट दूर होण्यासाठी व भविष्यात लोकसंख्या वाढणार असल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिक गडद होणार आहे.

त्यामुळे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गिरणा धरणातून शहरासाठी द्यावी, असे साकडे मुख्यमंत्र्यांना आपण घातले असता त्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ही योजना महत्वपुर्ण आहे. त्यामुळे या योजनेतील तांत्रिक अडचणी व इतर बाबींची पुर्तता अधिकार्‍यांनी तात्काळ पुर्ण करावी, असे निर्देश आ. कांदे यांनी यावेळी बोलतांना दिले.

बैठकीत शहर पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी, पाण्याचे आरक्षण व इतर बाबींंची सविस्तर माहिती मुख्यधिकारी पंकज गोसावी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे परदेशी, योजनेचे शाखाधिकारी एस.आर. पाटील, कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी दिली.

यावेळी नगरपालिकेचे अधिकारी गुलाब नवले, राहुल कुटे, बंडू कायस्थ, अनिल बुरकुल, अरुण निकम, चोपडे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com