नाशिकमध्ये होणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयासाठी मनपा मोफत जागा देणार

महासभेत सर्वानुमते ठराव मंजुर: गट नेत्यांच्या बैठकीत मनपाचा सहभाग बाबत निर्णय होणार
नाशिकमध्ये होणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयासाठी मनपा मोफत जागा देणार

नाशिक | प्रतिनिधी

म्हसरूळ शिवारातील गट नंबर २५७ मध्ये १४ हेक्टर ३१ आर इतकी महापालिकेच्या मालकीची जमीन शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मोफत देण्याचा निर्णय महासभेत झाला. यावरुन श्रेय घेण्याची चढाओढ दिसली तरी करोना काळात जर हे महाविद्यालय असते तर त्याचा नक्की मोठा फायदा नाशिककरांना झाला असता, असा सुर चर्चेतून निघाला...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी म्हसरूळ शिवारातील महापालिकेच्या मालकीच्या १४ हेक्टर जागेचे विद्यापीठाकडे हस्तांतरण करण्यास महासभेने सशर्त मंजुरी दिली.

या जागेवर उभारण्यात येणार्‍या रुग्णालयात महापालिकेचा सहभाग असावा, या रुग्णालयातील काही खाटा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उपचारासाठी राखीव ठेवण्यात याव्यात तसेच रुग्णालयाच्या समितीवर महापालिकेच्या प्रतिनिधीची नियुक्ती केली जावी, अशा अटींवर ही जागा आरोग्य विद्यापीठास मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केला.

प्रतिनिधी नियुक्तीबाबत सर्वपक्षीय गटनेत्याच्या बैठकीत निर्णय घेवून ठराव अंतिम केला जाईल, असेही महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करून १९मे रोजी तहकूब झालेली महासभा महापौर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी (दि.३१) ऑनलाईन पध्दतीने झाली.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत अध्यापन व संशोधन तसेच अतिविशेषोपचार सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी वारंवार केली जात होती.

विद्यापीठाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विद्यापीठ इमारतीच्या नुतनीकरण कार्यक्रमातही विद्यापीठाच्या वतीने ही मागणी पुढे रेटण्यात आली होती.

त्यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्भातील प्रस्तावाला लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल, असे घोषित केले होते. हे महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतूदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रक्रिया गतिमान असताना १४ हेक्टर जागा देण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे अडकला होता. जिल्हाधिकार्‍यांकडून जागा हस्तांतरणाचे मागणी पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भातील प्रस्ताव नगररचना विभागामार्फत तातडीने महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

परंतू दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करून महासभा तहकूब झाल्याने हा प्रस्ताव पुन्हा अडकला होता. अखेर आज झालेल्या महासभेत या प्रस्तावाला सशर्त मंजुरी मिळाली.

नाशिकच्या म्हसरूळ शिवारातील गट नंबर २५७ मध्ये १४ हेक्टर ३१ आर इतकी महापालिकेच्या मालकीची जमीन आहे. सदर जागा १९४४-४५ पासून मुक्त गुरुचरणाकडे वर्ग होती. त्यानंतर ही जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. १९८२ मध्ये जेव्हा नाशिक महापालिकेच्या स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या त्यावेळेस भूतपूर्व नगरपालिका तसेच आजूबाजूच्या २२ महसुली गावांचा समावेश झाल्यामुळे ग्रामपंचायतींच्या जागांचे हस्तांतरण महापालिकेकडे केले गेले. त्यामुळे या जागेचा ताबा महापालिकेला आला. सदर जागा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालयाकरीता देण्याबाबत १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय झाला होता. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्तावाला सोमवारी मुहूर्त लाभला. वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही जागा मोफत हस्तांतरीत केली जाणार आहे.

आरोग्य विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी महापालिकेची जागा मोफत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावरून महासभेत श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचे दिसून आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंजुरीमुळेच नाशकात वैद्यकीय महाविद्यालय साकारत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार, गुरूमित बग्गा यांनी केला तर महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात या वैद्यकीय महाविद्यालयाला जागा देण्याचा ठराव केला जात असल्याची आठवण महापौर सतीश कुलकर्णी यांनी करून दिली. यावर श्रेयवादाचे राजकारण न करता महापालिकेच्या हिताचा विचार या प्रस्तावाला मंजूरी देताना करावा, अशी सूचना मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी मांडली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com