नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या दिवंगत कर्मचार्यांच्या वारसांना मनपा सेवेत सामावून घेणेकामी शिवसेनेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सेनेच्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, अनुकंपावरील या भरतीसाठी स्वतंत्र समिती गठीत करुन वारसांची अनुषंगिक बाबींची पडताळणी केल्यानंतर तत्काळ नियुक्ती देणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासन उपायुक्त मनोज घोडेपाटील यांनी दिले आहे. यामुळे आता मनपातील अनुकंपा यादीतील वारसाच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला.

शासनाची परवानगी मिळून दोन महिने होवूनही या वारसांच्या नियुक्तीबाबत मनपा प्रशासनाकडून काहीच हालचाल न झाल्याने या वारसांनी आज (दि.16)मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांची भेट घेवून त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

यामध्ये अनेक वारसांची वयोमर्यादा उलटून चालली असून काहींचे विवाह रद्द होणे, आर्थिक संकट, कौटुंबिक अडचणी आदी विविध प्रकारच्या गंभीर समस्या मांडल्या. यावर विरोधी पक्षनेत्यांनी तात्काळ प्रशासन विभागाचे उपायुक्त घोडेपाटील यांना बोलावून त्यांचेशी चर्चा केली. मनपा स्तरावर याबाबत कार्यवाही चालू असुन याबाबत स्वतंत्र समितीची स्थापना करुन वारसांची शैक्षणिक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, वारसांबाबत इतर कुठले वाद नसल्याची खात्री आदी अनुशंगिक बाबींची पडताळणी होवून ही पडताळणी झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती देणार असल्याचे घोडेपाटील यांनी सांगितले.

यानंतर याच प्रश्नी अजय बोरस्ते, विलास शिंदे, चंद्रकांत खाडे यांनी आयुक्त कैलास जाधव यांचीही भेट घेवून सदर प्रकरणाबाबत संवेदनशिल मार्गाने लवकरात लवकर निर्णय घेवून नियुक्त्या देण्याची मागणी केली. आयुक्त जाधव यांनी कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रीयेला विलंब होत असल्याचे नमूद करुन या वारसांना न्याय देणेकामी प्रशासन सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर अजय बोरस्ते यांनी या वारसांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशिल राहील व शिवसेना या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.