स्थायीकडून २ हजार ७५९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

स्थायीकडून २ हजार ७५९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

नाशिक | प्रतिनिधी

करोनामुळे तब्बल दोन महिने रखडलेले महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज मार्गी लागले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी आज अंदाजपत्रकीय महासभा बोलाविली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता महापालिकेचे तब्बल २७५९ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्याकडून महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले...

महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभागांमध्ये विकासकामांसाठी नगरसेवकांना भरघोस निधी उपलब्ध करून देतानाच, नाशकात पंचवटी, सिडको व सातपूर भागांत तीन विशेष कोविड रुग्णालये उभारण्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे २३६१ कोटी रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी मार्च महिन्यात स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले होते.

करोना संकटामुळे विकासकामे अडचणीत आल्याने नागरिकांचा रोष पत्करलेल्या नगरसेवकांना विकासकामांसाठी प्रत्येकी ४० लाखांची भरीव तरतूद करताना, दोनशे कोटी रुपयांचे नवीन रस्ते, पूल व सांडवे बांधण्यासाठी २० कोटींची तरतूद आयुक्तांनी या अंदाजपत्रकात केली होती.

विशेष म्हणजे करोनामुळे महापालिकेच्या महसुलात घट झाली असली, तरी घरपट्टी, पाणीपट्टीसारख्या नागरिकांशी थेट संबंध असलेल्या करांमध्ये कोणतीही वाढ न करण्याची दिलासादायक भूमिका आयुक्त जाधव यांनी घेतली होती.

नगररचना विभागाकडून युनिफाईड डीसीपीआरमुळे बांधकामाची जास्ती जास्त प्रकरणे येतील, हे गृहीत धरून साडेचारशे कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न गृहीत धरण्यात आले होते. आयुक्तांचे हे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर सभापती गणेश गिते यांनी स्थायीची विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलावत या अंदाजपत्रकाला दुरुस्तीसह मंजुरी दिली होती.

स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंदाजपत्रक महासभेच्या मान्यतेला पाठवले जाते; मात्र मार्च महिन्यात करोनाची दुसरी लाट आल्यामुळे महासभेवर अंदाजपत्रक जाऊ शकले नाही. आता करोना उतरणीला लागल्याने स्थायी समितीने महासभेकडे अंदाजपत्रक मंजुरीची शिफारस केली आहे.

या अंदाजपत्रकात स्थायी समितीने विविध विकासकामांपोटी ४०० कोटी रुपयांची वाढ सुचविल्याने अंदाजपत्रकाचा आकडा आता २७५९ कोटींवर पोहोचला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com