
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या (NMC) विविध विभागांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर करावयाच्या कामांसह प्रकल्प व योजनांविषयी मनपाच्या सर्व विभागांनी तयार केलेला आराखडा सुमारे १० हजार कोटींवर गेला आहे. त्याबाबत सविस्तर सादरीकरण सोमवारी (दि.१८) आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर (Dr. Ashok Karanjkar) यांच्यासमोर केले जाणार आहे...
नाशिकमध्ये २०२७ मध्ये भरणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मनपाच्या सर्वच विभागप्रमुखांना प्राथमिक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या दीड महिन्यापासून प्रत्येक खातेप्रमुखांनी त्याबाबत बैठका घेऊन आराखडा तयार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साडे सहाशे कोटींच्या आराखड्यासह सर्वच विभागाचा आराखडा सुमारे १० हजार कोटींच्या जवळपास गेला आहे.
याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांनी सोमवारी (दि.१८) सादरीकरणाच्या सुचना दिल्या असून, त्यानंतर मनपाकडून अंतिमत: शासनाला सादर करण्याचा आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासन स्तरावर कुंभमेळ्याविषयक स्थापन होणार्या समित्यांच्या माद्यमातून यावर निर्णय घेतले जाणार आहेत.
पूर्वतयारी म्हणून महापालिकेने शहरात येणार्या भाविकांची संभावित संख्या, त्यांना लागणार्या विविध सेवा सुविधा, त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचा विचार करुनच आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने शहरातील इतर विभागांच्या संकल्पनांचा विचार करुन अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे.
या आराखड्यात प्रामुख्याने गोदावरी नदीपात्रावर घाट बांधणे व सुशोभिकरण, गोदावरीचे प्रदूषण कमी करणे, एसटीपी अद्ययावत करणे, बाह्य व अंतर्गत रिंगरोड, तसेच कॉलनी रस्ते तयार करणे, गोदावरीवर ठिकठिकाणी पूल उभारणे, साधूसंतांसाठी व रिंगरोडसाठी जागा संपादन करणे, विविध विभागांसाठी वाहने खरेदी करणे, मानधनावर सफाई कामगार घेणे, शहरातील विविध ठिकाणी वाहनतळे उभारणे, स्वच्छता गृह पिण्याच्या पाण्याचे नियोजन, मोबाईल चार्जिंग स्टेशन्स उभारणे, अशा विविध बाबींचा आराखड्यात समावेश असण्याची शक्यता आहे.