गाडी घरी लावीन पण मनपा बसनेच जाईन..!

गाडी घरी लावीन पण मनपा बसनेच जाईन..!

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिकेची बस सर्विस (Nashik NMC Bus Service) आता हळूहळू पटरीवर येताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.24) एकाच दिवसात अडीच लाख रुपये उत्पन्न बस सेवेच्या माध्यमातून महापालिकेला मिळाले आहे.

आतापर्यंत एका दिवसात एवढी कमाई झाली नव्हती, या दिवशी 12 हजार 300 नाशिककरांनी (Nashik Citizens) बस मध्ये प्रवास केला. दरम्यान नाशिक शहर परिसरात (Nashik City Area) ठिकठिकाणी बस थांब्यांवर आकर्षक असे थांबा फलक लावण्यास सुरुवात झाली आहे.

अत्यंत सुंदर व एकाच रंगाचे असे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. एका खांबावर दोन बाजू असलेल्या या फलकाच्या एका बाजूवर बसची माहिती राहील तर दुसर्‍या बाजूला जाहिरात घेण्यात येणार आहे, त्यामुळे थांबा फलकाचा (Bus Stop Board) खर्चाचा बोजा महापालिकेवर पडणार नाही, अशी माहिती महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी देशदूत’ शी बोलताना दिली.

सध्या नाशिक शहर परिसरातील 12 मार्गांवर महापालिकेची बस सर्व्हिस सुरू आहे. टप्प्याटप्प्याने आतापर्यंत 52 बसेस रस्त्यावर धावत असून यामध्ये 27 डिझेल बसेस तर 25 सीएनजी बसेस सुरू आहे.

सध्या नाशिक मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने निर्बध असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार पर्यंत गर्दी असते, यानंतर बाजार पेठ बंद होतात तर वीकेंड लॉक डाऊन मध्ये शनिवार व रविवार हे दोन दिवस आवश्यक वस्तूंची दुकाने सोडले तर इतर आस्थापने बंद असतात. त्यामुळे गर्दी देखील कमी राहते.

यामुळे शनिवार-रविवारचे उत्पन्न कमी असते. येत्या सोमवारपासून तीन लाख रुपये रोज उत्पन्न मिळणे महापालिका व्यवस्थापनाला अपेक्षित आहे. त्या दृष्टीने नियोजन देखील सुरू आहे.

पेट्रोल दरवाढीच्या परिणाम

सामान्य माणसाच्या पसंतीला महापालिकेची ही नवीन बस सेवा उतरली आहे. दुसरीकडे पेट्रोलचे दर एकशे आठ रुपये पेक्षा जास्त झाल्यामुळे आता सामान्य नागरिक स्वतःचे वाहन घरी लावून बस मध्ये प्रवास करताना दिसून येत आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडत असून दुसरीकडे वाहतूक कोंडी देखील कमी होऊन पर्यावरण समतोल राहील.

Related Stories

No stories found.