<p>नाशिक । दि.29 प्रतिनिधी</p><p>नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात वैद्यकिय अभ्यासक्रमांचे पदवीत्तर अभ्यासक्रम अंतर्भूत करुन वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढील अर्थिक वर्षात 100 कोटींची तरतुद करण्यासंदर्भातील मागणी मनपा लेखा व वित्त विभागाकडे नोंदविली जाणार असल्याची माहिती वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.</p> .<p>नाशिक मनपाच्या रुग्णालयात मुबंई व पुणे महापालिकेच्या धर्तीवर वैद्यकिय शाखेच्या पदवीत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मुंबईतील सीपीएस कॉलेजकडे गेल्या काही वर्षापासुन पाठपुरावा सुरू आहे. अगोदर या संस्थेकडे लेखी पाठपुरावा करण्यात आल्यानंतर हे प्रकरण पडुन होते. आता याकरिता पुन्हा एकदा पाठपुरावा करीत या संस्थेकडुन केलेल्या जाणार्या निरीक्षणाच्या कामासाठी लागणार्या शुल्कास मागील महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. आता या ठरावानुसार वैद्यकिय विभागाकडुन सीपीएस कॉलेजकडे शुल्क पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. अशाप्रकारे आता या कॉलेजचे पथक नाशिक मनपा बिटको महाविद्यालयातील सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी लवकरच येणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर वैद्यकिय पदवीत्तर महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या एकुणच घडामोडीत पुढच्या अर्थिक वर्षात या कामांस गती मिळावी म्हणुन नियोजीत पदवीत्तर वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे. म्हणुनच आयुक्त कैलास जाधव यांनी महाविद्यालयासाठी लागणारे वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, वसतीगृह, निधीची तरतुद व इतर आरोग्य सेवासंदर्भातील प्राथमिक आराखडा सादर करण्याचे आदेश वैद्यकिय विभागाला दिले. यानंतर आता येत्या 15 फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविलां जाणार आहे.</p><p>याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या सन 2021 - 22 या नवीन अर्थिक वर्षात मनपाच्या नियोजीत पदवीत्तर वैद्यकिय महाविद्यालयाच्या सेवा सुविधाकरिता 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात नियोजन करण्यात आले आहे. यानुसार मनपाच्या वित्त व लेखा विभागाकडे निधीची मागणी नोंदविली जाणार आहे. यास पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात मंजुरी मिळाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशाप्रकारे पुढील निर्णय झाल्यानंतर पुढच्या वर्षात महापालिकेच्या रुग्णालयात 13 विषयातील 56 डॉक्टरांची सेवा मिळणार आहे.</p>