
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. तसेच पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता...
मात्र, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रथा-परंपरेनुसारच आम्ही मंदिरात धूप दाखवण्यास गेलो होतो, अशी प्रतिक्रिया मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करण्याऱ्यांनी दिली होती. यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊन हा वाद आणखी चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज भाजप (BJP) आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी त्र्यंबकेश्वर येथे येऊन मंदिरात महाआरती केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी राणे म्हणाले की, या भागातील शांतता भंग करणे हा आमचा हेतू नाही. पण सातत्याने १३ मे रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात जे गैरसमज पसरवले जात आहे, हिंदूंची बदनामी केली जातेय, त्या सगळ्याबाबतीत गावकऱ्यांच्या इच्छेनुसार, ट्रस्टनुसार आज आम्ही भेट देण्यासाठी येथे आलो. उरूस निघाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे धूप दाखवण्याची परंपरा आहे, असे सातत्याने बोलले जाते. परंतु, हे साफ खोटे आहे. आम्ही यासंदर्भात ग्रामस्थांशी बोललो, विश्वस्तांशी बोललो. अशा कोणत्याही पद्धतीची परंपरा नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे", नितेश राणेंनी म्हटले.
तसेच राणे पुढे म्हणाले की, उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. ते लोक काय करतात? की धूप दाखवतात हा त्यांचा प्रश्न आहे. जिहादी विचारांचे युवक या मंदिरात आले. त्यांनी फेसबूक लाईव्ह केले. मंदिर बंद असताना मंदिरामध्ये शिरण्याचा हट्ट करण्यात आला. तुम्हाला पूजा-अर्चा करायची आहे तर सगळे जसे येतात तसे आतमध्ये या. आरतीचे सामान घ्या, पूजेचे सामान घ्या. रांगेत उभे राहा, आतमध्ये या. सगळे जसे दर्शन घेतात, हिंदू धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा. याला कोणालाही आक्षेप नाही", असेही नितेश राणे यांनी म्हटले.
दरम्यान, यावेळी माजी आदिवासी मंत्री अशोक उईके (Ashok Uike) बंटी दीक्षित, बाळू कळमकर, कैलास पाळेकर, कौशिक अकोलकर, गजू घोडके यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.