निफाड । प्रतिनिधी Niphad

येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील कादवा नदीपात्रावरील पूल अतीशय जीर्ण झाल्याने या पुलाचे कठडे तुटल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची वेळेत दुरुस्ती करून हा पूल वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर रहदारी वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले. साहजिकच निफाडजवळील कादवा नदीपात्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंगापूर पद्धतीचा पूल बांधला. या पुलावरून एकेरी वाहतूक तर याच शेजारी असलेल्या जुन्या पुलावरून दुसरी वाहतूक वळवण्यात आली. नाशिककडून निफाडकडे येणारी वाहने भरधाव वेगाने येत असल्याने या जुन्या पुलाला कठडे नसल्याने अनेक वाहने कादवा नदीपात्रात पडली आहेत. त्यामुळे वित्तहानीसह जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत.

अनेकवेळा या पुलाचे कठडे तुटूनही अद्यापपर्यंत त्याची दुरुस्ती केली नाही. साहजिकच कठड्याला संरक्षण म्हणून जेेथे पुलाचे कठडे तुटले आहेत तेथे बॅरिकेडस् उभे करण्यात आले आहेत. परंतु रात्रीच्या अंधारात या तुटलेल्या कठड्यांचा अंदाज वाहनचालकाला येत नाही. तसेच या पुलाच्या बांधकामात टाकलेल्या आडव्या पाईपवरती काँक्रिटीकरण झाल्याने तेथे गतिरोधकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड येथील तहसील कार्यालय रसलपूर शिवारात स्थलांतरीत होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या पुलावरील रहदारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच परिसरातील जळगाव, कुरूडगाव, काथरगाव, रसलपूर, सुंदरपूर, कोठूरे, पिंपळस रामाचे आदी परिसरातील गावच्या नागरिकांची निफाडला येण्यासाठी या पुलावरून नित्याची वर्दळ असते. पुलाची रुंदी कमी असल्याने भरधाव वेगाने धावणारी वाहने आणि याच पुलावरून जाणारे-येणारे पादचारी यांना पूल ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुलाजवळ पादचारी मार्ग बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलाचे नूतनीकरण करताना पादचारी मार्ग बनवण्यात यावा व या पुलावरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासह व्यावसायिकांनी केली आहे.