
निफाड | आनंदा जाधव | Niphad
कधी नव्हे तो निफाडचा (niphad) पारा बुधवारी 42 अंशावर गेला होता. आत्तापर्यंतचे हे तालुक्यातील सर्वाधिक तापमान (Temperature) होय. उन्हाच्या तीव्र झळांमुळे (heat waves) अंगातून घामाच्या धारा निघत होत्या.
वृक्षाची बेसुमार होणारी कत्तल (tree felling), पाण्याची खालावत चाललेली पातळी यामुळे निसर्गाचा समतोल ढासाळत असून त्याचा थेट परिणाम आता जाणवू लागला आहे. आत्तापर्यंत निफाडचा पारा कधीही 40 अंशापर्यंत पोहचला नव्हता. आता मात्र तापमानाने चाळीशी ओलांडली असून अवघा तालुका उन्हाच्या तिव्रतेने भाजू लागला आहे. मागील वर्षापर्यंत निफाडचे तापमान (Niphad temperature) 35 अंशापर्यंत येत असे. यावर्षी मात्र मे महिन्यात तापमानाचा पारा (Temperature mercury) 42 अंशावर गेला असून तापमानात अशीच वाढ होत राहिली तर मानवासह पशु-पक्षांना जगणे अवघड होणार आहे.
वाढत्या तापमानाचा फटका शेतीमशागतीला देखील बसू लागला आहे. अगदी राजस्थान (rajsthan) सारखी परिस्थिती निफाड तालुक्यात (niphad taluka) तयार होवू लागली आहे. निफाड तालुका हा हिरवाईने नटलेला असतांनाही अशा परिस्थितीत तापमानात झालेली मोठी वाढ आगामी धोक्याची घंटा देणारी ठरू लागली आहे. सूर्य आग ओकू लागल्याने दुपारी रस्ते सुनसान होवू लागले आहेत. सावलीत अन् घरात बसावे तर उन्हाच्या झळांनी जीव कासावीस होत असून अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पंखे, कुलर सुरू करावे तर विजवितरण कंपनीकडून (Distribution Company) मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे.
यावर्षीच्या अति उष्णतेचा फटका कांदा पिकाला बसला असून शेतातून कांदा (onion) काढणीपूर्वीच तो तीव्र उष्णतेमुळे भाजल्याने त्याची टिकवण क्षमता घटली आहे. उन्हामुळे भाजीपाला, मका, ऊस, द्राक्षबागा यांनाही झटका बसला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शुभविवाह सायंकाळच्या वेळी संपन्न होवू लागले आहेत. निफाड तालुक्याच्या सर्व भागात नदी, नाले, कालवे, वळण बंधारे यामुळे सर्वच भागात पाणी फिरले आहेत. ऐन उन्हाळ्यात देखील पाणीटंचाईची (Water scarcity) तीव्रता जाणवत नाही. केवळ विजभारनियमनामुळे पाणी पुरवठ्याला अडचणी येत आहेत.
तालुक्याचा शिवार हिरवागार असतांनाही आत्ताची वाढलेली उष्णता डोकेदुखी ठरणारी आहे. निफाड तालुक्यात उन्हाची ही अवस्था असेल तर मग चांदवड (chandwad), येवला (yeola), नांदगाव (nandgaon), सिन्नर (sinnar), मालेगाव (malegaon), पेठ (peth), सुरगाणा (surgana) आदी तालुक्यांचा विचार न केलेला बरा. वाढत्या उष्णतेला खर्या अर्थाने आपणच जबाबदार आहोत. गेल्या काही वर्षापासून जंगले नष्ट होत आहेत. वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. पावसाळ्यात फक्त वृक्षारोपणाची मोहिम राबविली जाते. मात्र या झाडांचे संगोपण व संवर्धन होत नसल्याने एकाच खड्डयात दरवर्षी वृक्षारोपण करावे लागत आहे. वृक्षाअभावी ऑक्सिजनचे प्रमाण घटले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले. एकूणच ऋतुचक्र बदलतांना दिसत आहे.
अति पाण्याच्या उपशामुळे जमिनीतील पाणी पातळी घटल्याने जमिनीत देखील उष्णतेचे प्रमाण वाढू लागले आहेत. बदलत्या हवामानाचा वेळीच विचार करून त्यावर उपाययोजना केल्या नाही तर अगदी थोड्याच कालावधीत निफाडचा पारा 50 अंशाच्या पुढे जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याबरोबरच लावलेली झाडे जगावी यासाठी अन् वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वनविभागाने देखील त्यांचे पडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन मोहिम राबवावी यासाठी शासनाने सर्व विभाग,
स्थानिक स्वराज्य संस्था, सेवाभावी मंडळे, मित्र मंडळे, पक्ष संघटना यांनीही पुढाकार घेवून वृक्षरोपणाची चळवळ अधिक व्यापक करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचा देखील काटकसरीने वापर झाला पाहिजे. विशेषत: कुटुंबनिहाय वृक्षारोपणावर भर देवून लावलेलेे रोेपटे जगविले पाहिजे हा विचार सर्वांनी कृतीतून केला पाहिजे. अन्यथा तापमानाचा पारा वाढत जावून तो मानवाच्या विनाशास कारणीभूत ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.