निफाड : देवगावसह तालुक्यात पावसाची हजेरी
नाशिक

निफाड : देवगावसह तालुक्यात पावसाची हजेरी

शेतात पाणी साचले

Abhay Puntambekar

देवगाव। वार्ताहर Devgaon / Niphad

देवगावसह संपूर्ण तालुक्यात पावसाने एक तासाहून अधिक काळ हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांना जीवदान मिळणार असून खोळंंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातील पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी मका, सोयाबीन, भुईमुंग व ऊस लागवड पूर्ण केली होती. या पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. अनेक शेतकर्‍यांनी उधार, ऊसनवारी करत खते, बीयाणे खरेदी केली. काहिंनी कर्ज काढून व सावकाराकडून पैसे घेवून पेरण्या उरकल्या होत्या.

पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र गत दोन दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने जळू पाहणार्‍या पिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी सुमारे तासभर बरसलेल्या पावसामुळे संपूर्ण शिवार ओलाचिंब होऊन शेतात पाणी साचले होते. तर परिसरातील नदी, नाले खळाळू लागले. दर्‍या-खर्‍या व डोंगरांनी हिरवा शालू पांघरला. गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता देखील वाढली होती. त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आदेश लागू असल्याने खते, बीयाणे घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले होते. पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत होती.

मात्र वरूणराजाने काल धुवॉधार हजेरी लावत संपूर्ण तालुका ओलाचिंब केला. या पावसामुळे शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर समाधानाचे ढग दाटून आले असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जोरदार पाऊस बरसल्याने काही प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे. एकुणच पाऊस पडता झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा शेतीमशागतीत व्यस्त झाला आहे. बुधवारी देवगावसह निफाड, खडकमाळेगाव, चांदोरी, नैताळे, लासलगाव, विंचूर, म्हाळसाकोरे, खेडलेझुंगे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

Deshdoot
www.deshdoot.com